वेगाने वाढणाऱ्या ई-कॉमर्स व्यवसायावर रिझव्‍‌र्ह बँकेचे नियंत्रण येणार असून मध्यवर्ती बँक स्वत: त्यासाठीची मार्गदर्शक तत्त्वे लागू करण्याच्या विचारात आहे.
रिझव्‍‌र्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर एच. आर. खान यांनी अशा नियंत्रणाचे संकेत बुधवारी मुंबईत दिले. भारतीय राष्ट्रीय देय महामंडळाच्या (एनपीसीआय) उत्कृष्ट पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते.
ई-कॉमर्स व्यवहाराबाबत काहीशी चिंता व्यक्त करतानाच त्यातील काही मुद्दय़ंवर लक्ष केंद्रित करण्याची गरज यावेळी त्यांनी प्रतिपादन केली. ई-कॉमर्स हे माध्यम नावीन्यपूर्ण असून त्यापासून लांब जाता येणार नाही, असे मतही त्यांनी यावेळी मांडले. स्नॅपडिलने एक अब्ज डॉलरच्या एकाच दिवसातील व्यवहारानंतर अनेक खरेदीदार-विक्रेत्यांची निराशा झाल्याचा प्रकार ऐन दिवाळीत घडला होता. त्याची दखल घेत केंद्रीय वाणिज्य व उद्योग खात्याच्या मंत्री निर्मला सीतारामन यांनीही ई-कॉमर्स व्यवसायावर नियंत्रण आणण्याची आवश्यकता मांडत मार्गदर्शक तत्त्वे लागू करण्याची घोषणा केली होती. हे कार्य आता रिझव्‍‌र्ह बँकेकडे आल्याचे आता स्पष्ट होत आहे.
खान यांनी मात्र या व्यवसायासाठी स्वतंत्र नियामक संस्थेची गरज नसल्याचे नमूद केले. याबाबतच्या आराखडय़ाची तयारी यंदाच्या जुलैमध्येच करण्यात आली होती, असेही ते म्हणाले. मार्गदर्शक तत्त्वे जारी करून व्यवसायासाठीचे अर्ज फेब्रुवारी २०१५ मध्ये मागविले जातील, अशी माहिती त्यांनी याप्रसंगी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा