सोन्यातील वाढत्या गुंतवणुकीला आळा घालण्याचा प्रयत्न म्हणून महागाईशी सांगड घालणारे रोखे बाजारात आणण्याचा निर्णय रिझव्‍‌र्ह बँकेने घेतला आहे. यानुसार येत्या ४ जूनपासून दर महिन्याला रिझव्‍‌र्ह बँक रोखे गुंतवणूकदारांसाठी खुले करेल.  
२०१३-१४ मध्ये १५,००० कोटी रुपयांचे रोखे विक्रीसाठी उपलब्ध करण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात १,०००-२,००० कोटी रुपयांचे १० वर्षे मुदतीचे रोखे असतील. नंतर हे रोखे दर महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी सादर करण्यात येतील. या रोख्यांच्या व्याजाचा दर स्थिर राहणार असून मुद्दल ही घाऊक किमतीवर आधारित महागाई निर्देशांकाशी निगडित असेल. मुदतपूर्तीच्या प्रसंगी व्याजदराने परतावा वा महागाईशी निगडित परतावा यापैकी जी किंमत अधिक असेल ती रोखेधारकाला मिळेल.
पहिल्या टप्प्यातील रोखे हे सर्व प्रकारच्या गुंतवणूकदारांसाठी असतील. तर ऑक्टोबरपासून दुसऱ्या टप्प्यात जारी होणाऱ्या रोख्यांमध्ये केवळ किरकोळ गुंतवणूकदारांनाच सहभागी होता येईल. वाढत्या महागाईमुळे रुपयाच्या मूल्यावर उपाय म्हणूनही सोन्यामध्ये मोठय़ा प्रमाणात गुंतवणूक होते. भारताला सोने आयात करावे लागत असल्यामुळे आयात-निर्यातीचा समतोल बिघडून व्यापार तूट वाढते. (२०१२-१३ मध्ये ही तूट ६.७ टक्के विक्रमी पातळीवर गेली आहे.) सोन्याचा वापर करण्यासाठी रिझव्‍‌र्ह बँकेने बँक तसेच बिगर बँकिंग वित्तसंस्थांमार्फत होणाऱ्या सोने तारणावर मर्यादा घातल्या होत्या. सोन्याप्रमाणेच आकर्षक परतावा देणाऱ्या विविध बचत योजना सुरू करण्याबाबत माजी डेप्युटी गव्हर्नर सुबीर गोकर्ण यांनी सहमती दिली होती. महागाई निगडित रोखे आणण्याचे मध्यवर्ती बँकेने वार्षिक पतधोरणात सूचित केले होते.
एप्रिल २०१२ च्या तुलनेत यंदाच्या एप्रिलमध्ये सोने आयात सुमारे १३८ टक्क्यांनी वाढली आहे.

Story img Loader