पाच रुपयांपासून एक हजार रुपयांपर्यंतच्या २००५पूर्वीच्या सर्व नोटा येत्या एक एप्रिलपासून बाजारातून बाद करण्याचा निर्णय रिझव्र्ह बँकेने बुधवारी जाहीर केला. दैनंदिन व्यवहारात या नोटा ३१ मार्चपर्यंतच चालू शकतील, असे स्पष्ट करतानाच पुढील सूचना देईपर्यंत अशा नोटा एक एप्रिलनंतरही बँकेत जमा करता येतील, असेही रिझव्र्ह बँकेने म्हटले आहे. काळा पैसा आणि बनावट चलनाला आळा घालण्यासाठी रिझव्र्ह बँकेने हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येते.
रिझव्र्ह बँकेच्या या घोषणेने सर्वसामान्यांत खळबळ उडण्याची शक्यता आहे. मात्र, लोकांनी घाबरून जाऊ नये. कारण या नोटा एक एप्रिलनंतरही बँकांमध्ये जमा करता येतील, असे रिझव्र्ह बँकेने म्हटले आहे. यासाठी आपल्या शाखांमध्ये सुविधा कक्ष सुरू करावा, अशा सूचनाही रिझव्र्ह बँकेने दिल्या आहेत.
कारण काय?
२००५पूर्वीच्या नोटा हद्दपार करण्याचे कारण रिझव्र्ह बँकेने दिलेले नाही. मात्र, देशात रोख स्वरूपात दडवून ठेवण्यात आलेल्या काळय़ा पैशावर नियंत्रण आणण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. याशिवाय २००५नंतर रिझव्र्ह बँकेने बाजारात आणलेल्या नव्या नोटांवर अधिक सुरक्षाचिन्हे असल्याने या निर्णयामुळे बनावट नोटांनाही आवर बसेल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
सुट्टे पैसे घेताना सावधान!
येत्या एक जुलैपासून ५०० किंवा एक हजार रुपयांच्या दहा पेक्षा अधिक नोटांचे सुट्टे घेऊ इच्छिणाऱ्या लोकांना आपले छायाचित्रासह ओळखपत्र आणि निवासाचा पत्ता दाखल करणे बंधनकारक असेल, असेही रिझव्र्ह बँकेने म्हटले आहे.