बँकिंग व्यवस्थेतील रोखीला शोषून घेणाऱ्या रिझव्‍‌र्ह बँकेच्या उपाययोजना तात्पुरत्या स्वरूपाच्याच असतील आणि रुपया एकदा स्थिरस्थावर झाल्यावर त्या पुन्हा माघारी घेतले जाईल, याबद्दल आघाडीच्या बँकांकडून विश्वास व्यक्त केला जात आहे. रिझव्‍‌र्ह बँकेचे उपाय हे तात्पुरते आणि रुपयातील अस्थिरतेला शांत करण्यापुरतेच आहेत. एकदा रुपयाचे मूल्य स्थिर झाल्यास, या उपायांना लागलीच मागे घेतले जाईल, असा विश्वास स्टेट बँकेचे अध्यक्ष प्रतीप चौधरी यांनी व्यक्त केला. रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर डी. सुब्बाराव यांनी नवी दिल्लीत पंतप्रधान मनमोहन सिंग आणि अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांच्याशी सोमवारी झालेल्या चर्चेनंतर सायंकाळी उशिराने या निर्णयांची घोषणा केली. रिझव्‍‌र्ह बँकेचे उपाय हे तात्पुरते स्वरूपाचे असून, व्याजदरात नरमाई आणण्याचे आजवर अवलंबिलेल्या धोरणाला मुरड घालणारे ठरणार नाहीत, असा विश्वास बँक ऑफ बडोदाचे अध्यक्ष एस. एस. मुंद्रा यांनीही व्यक्त केला. हे उपाय किती काळ सुरू राहतात, त्या अवधीवरून कर्जावरील व्याजाचे दर हे वाढवावेत की नाही, याबद्दल निर्णय घेतला जाईल, असा निर्वाळा या दोन्ही सरकारी बँकांच्या प्रमुखांनी दिला.

Story img Loader