करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशात सध्या लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. आर्थिक व्यवहारांवरदेखील याचा मोठा परिणाम झाला आहे. बांधकाम व्यवसाय क्षेत्रालाही याचा मोठा फटका बसताना दिसत आहे. देशातील ९ मोठ्या शहरांमध्ये जानेवारी ते मार्च या कालावधीदरम्यान घरांच्या विक्रीत मोठ्या प्रमाणात घट झाल्याचं दिसून आलं. यामध्ये मुंबई, पुणे, बंगळुरू, चेन्नई, अहमदाबाद, गुरुग्राम, हैदराबाद, नॉएडा आणि कोलकाता या शहरांचा समावेश आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महाराष्ट्रातील विक्रीकडे पाहिल्यास मुंबईतील घरांच्या विक्रीतील मागणीमध्ये १४ टक्क्यांची घट होऊन ती २३ हजार ९६९ युनिट्स राहिली आहे. तर पुण्यातही घरांच्या विक्रीतील मागणीत १५ टक्क्यांची घट होऊन ती १५ हजार ५२३ अपार्टमेंट इतकी राहिली आहे. प्रॉप टायगरनं जाहीर केलेल्या अहवालातून ही बाब समोर आली आहे. तर अहमदाबादमध्ये घरांच्या विक्रीत ३६ टक्क्यांची घट होऊन ती ४ हजार ५४९ युनिट्स इतकी राहिली असून बंगळुरूतही २४ टक्क्यांची घट होऊन ती ८ हजार १९७ युनिट झाली आहे.

चेन्नईमध्ये विक्रीत २३ टक्क्यांची घट होऊन ती ३ हजार ६४३ युनिट्स तर हैदराबादमध्ये घरांच्या विक्रीत ३९ टक्क्यांची घट होऊन ती ५ हजार ५५४ युनिट्स राहिली आहे. दिल्ली एनसीआर क्षेत्रात पाहिलं तर गुरूग्रामध्ये घरांच्या विक्रीत सर्वाधिक ७३ टक्क्यांची घट झाली असून ती १ हजार ९०१ युनिट इतकी राहिली आहे. तर नॉएडामध्ये विक्रीत २६ टक्क्यांची तर कोलकात्यात विक्रीत ४१ टक्क्यांची घट होऊन ती अनुक्रमे ३ हजार १५२ युनिट आणि २ हजार ७४७ युनिट इतकी राहिली आहे.

या नऊ प्रमुख शहरांमध्ये आर्थिक मंदी आणि करोना व्हायरसमुळे घरांच्या मागणीवर परिणाम झाला असल्याचे प्रॉप टायगरच्या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. जानेवारी ते मार्च या कालावधीदरम्यान घरांच्या विक्रीत जवळपास २६ टक्क्यांची घट झाली आहे. ‘Real Insight: Q4 FY20’ मधील अहवालात हाऊसिंग ब्रोकरेजनं म्हटलं की मार्च मध्ये संपणाऱ्या तिमाहित एकूण ६९ हजार २३५ युनिट्सची विक्री झाली. गेल्या आर्थिक वर्षांच्या याच तिमाहित ९३ हजार ९३६ युनिट्सची विक्री झाली होती.

नव्या घरांच्या बांधकामात ही घट
रिपोर्टनुसार नव्या घरांच्या बांधकामतही अर्ध्यापेक्षा अधिक घट झाली आहे. या कालावधीदरम्यान ७२ हजार ९३२ वरून ही संख्या ३५ हजार ६६८ युनिट्स वर आली आहे. तर आणखी एका ब्रोकरेज फर्मनुसार २०२० च्या पहिल्या तीन महिन्यांमध्ये विक्रीत ३० ते ४० टक्क्यांची घट झाल्याचं सांगण्यात आलं आहे.

मार्च महत्त्वाचा महिना
Housing.com, Makaan.com and PropTiger.com या समुहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी ध्रुव अग्रवाल यांनी बोलताना सांगितलं की,”करोना व्हायरसचा परिणाम गेल्या तिमाहितील घरांच्या विक्रीवर दिसून आला. घरांच्या विक्रीसाठी मार्चचा महिना महत्त्वपूर्ण असतो. लॉकडाउनमुळे अनेक आर्थिक व्यवहार थांबले आहेत तसंच सर्वच क्षेत्रांवर याचा परिणाम झाला आहे. बांधकाम क्षेत्रही त्यापैकी एक आहे.”

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Real estate sector affected due to coronavirus lockdown sell decreases said in report jud