२०१४ मधील सर्वसाधारण निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मतदारांना चुचकारण्याच्या ओघात आर्थिक सुधारणांबाबत हयगय दिसून आल्यास पर्यायाने देशाचा विकासदर अधिक घसरत जाईल; आणि परिणामत: भारतावर पतमानांकन कमी करण्याचे संकट कोसळू शकेल, असा इशारा ‘फिच’ या आंतरराष्ट्रीय पतमानांकन संस्थेने दिला आहे. गेल्याच आठवडय़ात मूडीज् आणि गोल्डमॅन सॅक्स या आंतरराष्ट्रीय संस्थांनी पदपथावर असलेल्या आर्थिक सुधारणांच्या जोरावर भारताचे पतमानांकन मार्च २०१३ अखेर ५.५ टक्क्यांपेक्षा अधिक असेल, असा गुणवत्तेचा शेरा दिला आहे.
२०१४ मध्ये भारतात लोकसभेसाठी निवडणुका होत आहेत. त्यामुळे आर्थिक सुधारणा राबविण्यासाठी आगामी २०१३ हे वर्षच शिल्लक आहे. सध्याच्या बिकट अर्थव्यवस्थेला सक्षम आधार देण्यासाठी कठोर निर्णयांची आवश्यकता प्रतिपादन करतानाच त्यादृष्टीने आर्थिक सुधारणा राबविताना कदाचित या निवडणुकातील मतांचे राजकारण आड येऊ शकते, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. वित्तीय सुधारणा न राबविल्या गेल्यास पतमानांकनाबरोबरच विकास दरही खुंटविला जाऊ शकतो, असेही म्हटले गेले आहे.
‘फिच’ने सध्या भारताला ‘बीबीबी’ असे दिलेले पतमानांकन कायम ठेवले आहे. देशातील अर्थव्यवस्था गुंतवणूक पातळीपेक्षा अधिक असल्याचे हे पतमानांकन दर्शविते. पायाभूत क्षेत्रातील गुंतवणूक आणि महागाईतील घसरण यामुळे हे पतमानांकन अधिक भक्कम होईल, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला आहे. पतमानांकन संस्थेने जून २०१२ मध्ये भारताचे पतमानांकन ‘नकारात्मकते’तून ‘स्थिरते’कडे आणले होते. आणि येत्या वर्ष-दोन वर्षांत पतमानांकन कमी होण्याची शक्यता असल्याचे पुढच्याच महिन्यात स्पष्ट करण्यात आले होते.
भारताचे पतमानांकन कमी करताना ते गुंतवणूकयोग्य पातळीपेक्षा कमी होण्याची शक्यता वर्तवितानाच ‘फिच’ने चालू आर्थिक वर्षांत सकल राष्ट्रीय उत्पादन ६ टक्के असेल, असा अंदाज व्यक्त केला आहे. गेल्या आर्थिक वर्षांच्या ६.५ टक्क्यांपेक्षा हा अंदाज कमी आहे. पतमानांकन संस्थेने या वर्षांसाठीही पूर्वी हाच अंदाज वर्तविला होता.
२०१२-१३ या संपूर्ण आर्थिक वर्षांसाठी सरकारने विकास दराचे उद्दीष्ट ५.५ टक्के राखले आहे. जुलै ते सप्टेंबर या चालू आर्थिक वर्षांच्या दुसऱ्या तिमाहीत देशाचे सकल राष्ट्रीय उत्पादन ५.३ टक्के राहिले आहे.    
मॉर्गन स्टॅनलेचा अर्थवृद्धीचा अंदाज ५.४%
‘मॉर्गन स्टॅनले’ने देशाचा आर्थिक विकासदर आधीच्या आपल्या पूर्वीच्या अंदाजापेक्षा उंचावला आहे. वाढती महागाई आणि चालू खात्यातील वधारती वित्तीय तूट या चिंताजनक बाबी असल्या तरी चालू आर्थिक वर्षांच्या दुसऱ्या तिमाहीतील सकल राष्ट्रीय उत्पादनाचा दर हा अपेक्षेपेक्षा चांगला (५.३%) असल्याचे मत व्यक्त केले आहे. यामुळे मार्च २०१३ अखेर देशाचा विकास दर आधीच्या ५.१ टक्के अंदाजापेक्षा अधिक, ५.४ टक्के असेल, असे म्हटले आहे. आंतरराष्ट्रीय अर्थसंस्थेने २०१३-१४ या आगामी वर्षांचा विकास दर मात्र ६.२ टक्के असा स्थिर ठेवला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा