गतिमान दूरसंचार सेवा देणाऱ्या ४जी ब्रॉडबॅण्ड व्यवसायासाठी थोरले बंधू मुकेश यांच्या रिलायन्स जिओ इन्फोकॉमने आपले धाकटे बंधू अनिल यांच्या ‘रिलायन्स कम्युनिकेशन्स’चे ऑप्टिक फायबर जाळे वापरासाठी करार शुक्रवारी मार्गी लावला. सुमारे १२,००० कोटी रुपयांच्या या करारान्वये, ‘रिलायन्स जिओ’ या अनिल अंबानी यांच्या देशभरात फैलावलेल्या १.२० लाख किलोमीटरचे ऑप्टिक फायबरचे जाळे आणि ४५,००० टॉवर्सचा वापर करता येणार आहे.
२००५ मध्ये मुकेश व अनिल हे दोघे अंबानी बंधू व्यावसायिक मतभेदांमुळे विभक्त झाले होते. रिलायन्स उद्योगसमूहाची ही थोरली व धाकटी पाती पुन्हा एकत्र येण्याने भांडवली बाजारही सुखावला असला तरी सर्वाधिक लाभ धाकटय़ा बंधूंच्या पथ्यावर पडला आहे. या तारेवरच्या सख्याविषयी घोषणा २ एप्रिल २०१३ रोजी करण्यात आली होती. तेव्हापासून रिलायन्स कम्युनिकेशन्स (आर-कॉम)चा समभाग तब्बल ८५ टक्क्यांनी वधारला आहे. २ एप्रिल रोजी आर-कॉमचा रु. ६३.३० बंद भाव, ७ जूनअखेर रु. ११६.४० वर पोहोचला आहे. ३७,३६० कोटी रुपयांच्या कर्जाचा प्रचंड डोंगर डोईवर असलेल्या अनिल अंबानी यांच्यासाठी हा सौदा म्हणजे बुडत्याला आधारच ठरेल.
मुकेश अंबानी यांच्या रिलायन्सने ४जी सेवेसाठी २०१० मध्ये देशभरातील सर्व २२ परिमंडळांत परवाने प्राप्त करणाऱ्या ‘इन्फोटेल ब्रॉडबॅण्ड’चा ९५ टक्के हिस्सा खरेदीसह ताबा घेतला. सध्याच्या घडीला देशव्यापी परवाने प्राप्त असलेली त्यांची रिलायन्स जिओ ही एकमेव कंपनी असून, या व्यवसाय-स्वारस्याविषयी काल झालेल्या भागधारकांच्या सभेतही अंबांनी यांनी प्रचंड आशावाद व्यक्त केला आहे. ही सेवा येत्या काही महिन्यांत प्रत्यक्षात येण्याची शक्यता निर्माण झाली असून, चालू वर्षांत नवीन देशात-विदेशातून ७,००० इतक्या प्रशिक्षित मनुष्यबळाच्या भरतीची योजनाही त्यांनी मांडली आहे.

Story img Loader