सोन्याच्या वाढत्या आयातीमुळे देशाची अर्थव्यवस्था अडचणीत आलेली असताना, खासगी क्षेत्रातील रिलायन्स कॅपिटलने देशभरातील सोने विक्रीला शुक्रवारी स्थगिती दिली. नागरिकांनी सोने खरेदीचा मोह टाळावा, असे आवाहन गेल्याच आठवड्यात अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी केले होते. खासगी कंपन्यांकडून करण्यात येणाऱया सोने विक्रीवर कपात करण्यासाठी रिझर्व्ह बॅंकेने विविध उपाययोजना केल्या होत्या. त्याचवेळी स्वतःहून सोने विक्रीला स्थगिती देण्याचा निर्णय रिलायन्स कॅपिटलने घेतला.
रिलायन्स कॅपिटल आणि तिच्या उपकंपन्यांकडून सोन्याची नाणी आणि इतर सोन्याची विक्री तात्काळ स्थगित करण्यात आली असल्याचे कंपनीने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. अनिल धीरूभाई अंबानी समूहातील रिलायन्स कॅपिटलने देशातील अर्थव्यवस्थेचा विचार करून हा निर्णय घेतला. सोन्याच्या मोठ्या प्रमाणावरील आयातीमुळे चालू खात्यावरील तूट दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळेच अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी केंद्र सरकारने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून सोने विक्रीला स्थगिती दिल्याचे कंपनीने स्पष्ट केले.