सुमारे ३५ हजार कोटी रुपयांच्या कर्जाचा भार येत्या सहा महिन्यांत २० हजार कोटी रुपयांवर आणण्याचा निर्धार रिलायन्स कम्युनिकेशन्सचे अध्यक्ष अनिल अंबानी यांनी कंपनीच्या भागधारकांसमोर व्यक्त केला. स्पर्धक बंधू मुकेश अंबानी यांची ४जी सेवा येऊ घातली असतानाच रिलायन्स कम्युनिकेशन्सही या क्षेत्रात येत्या वर्षांत शिरकाव करणार आहे.
ग्राहकसंख्येत देशातील दुसऱ्या क्रमांकाची दूरसंचार कंपनी असलेल्या रिलायन्स कम्युनिकेशन्सची वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवारी मुंबईत झाली. अनिल धीरुभाई अंबानी समूहाचे अध्यक्ष अनिल अंबानी यांच्या पत्नी टीना अंबानी व पुत्र जय अनमोल हेही या वेळी उपस्थित होते.
अनिल धीरुभाई अंबानी समूहातील रिलायन्स कम्युनिकेशन्सच्या यंदाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेचा रोख हा मुख्यत्वे कर्ज पुनर्रचना योजनेवरच होता. कंपनीवर सध्या ३५ हजार कोटी रुपयांच्या कर्जाचा भार आहे. येत्या दोन वर्षांत तो निम्म्यापेक्षाही कमी पातळीवर आणण्यात येणार असल्याचा निर्धार अंबानी यांनी या वेळी व्यक्त केला. तर चालू आर्थिक वर्षअखेर, मार्च २०१५ पर्यंत हे कर्ज २० हजार कोटी रुपयांवर येईल, असा विश्वास अंबानी या वेळी व्यक्त केला. मान्यताप्राप्त संस्था गुंतवणूकदारांच्या माध्यमातून तूर्त ६ हजार कोटी रुपयांचे कर्ज कमी करण्यात आल्याची माहितीही त्यांनी याप्रसंगी दिली.
निप्पॉनच्या सहकार्याने रिलायन्स आरोग्य निगा विमा क्षेत्रातही बँक परवान्यासाठी प्रतीक्षेत असलेल्या रिलायन्स कॅपिटलच्या सभेत अंबानी यांनी कंपनीचे भांडवल येत्या चार वर्षांत दुप्पट करण्याचा मनोदय व्यक्त केला. याअंतर्गतच गृह वित्त व्यवसायासाठी तिप्पट भांडवल ओतण्याची तयारी त्यांनी या वेळी दर्शविली. रिलायन्स कॅपिटलचे भांडवल तूर्त ११,२८९ कोटी रुपये आहे. विमा, वित्त पुरवठा, समभाग व वायदा वस्तू व्यवहार, म्युच्युअल फंड आदी व्यवसाय कंपनी यामार्फत करते. पैकी बहुसंख्य व्यवहारासाठी कंपनीची भागीदार जपानची निप्पॉन कंपनी आहे. आरोग्य निगा विमा व्यवसाय भागीदारीसाठी निप्पॉन उत्सुक असून त्यासाठी कंपनीला तूर्त अधिक भांडवली आवश्यकता नाही, असेही अंबानी यांनी या वेळी स्पष्ट केले.
भागधारकांची तारांबळ!
अनिल धीरुभाई अंबानी समूहातील प्रमुख चार कंपन्यांची सर्वसाधारण सभा मंगळवारी एकाच दिवशी मुंबईत झाली. अवघ्या दोन -दोन तासांच्या अंतराने या सभांचे वेळापत्रक बनविले गेल्याने सर्व सभांसाठी उपस्थित राहण्यासाठी भागधारकांची मात्र तारांबळ झाली. या चारही कंपन्यांचे बहुसंख्य भागधारक हे एकच असल्याने एकाच दिवशी एकाच ठिकाणी सभा घेणे सोयीचे ठरेल, असा खरे तर कंपनीचा बेत होता.