धनत्रयोदशीच्या निमित्ताने कागदी सोन्यातील अर्थात ‘गोल्ड ईटीएफ’साठी झालेले सर्वाधिक व्यवहार रिलायन्स कॅपिटलने नोंदविले आहेत. या एका दिवसात कंपनीच्या गोल्ड ईटीएफ फंडाचे १,४१३ कोटी रुपयांचे व्यवहार झाले. कंपनीच्या इतिहासात दिवाळीच्या मुहूर्ताला झालेले हे विक्रमी व्यवहार होत. मुंबई तसेच राष्ट्रीय शेअर बाजार असे दोन्ही शेअर बाजार मिळून गोल्ड एक्स्चेन्ज ट्रेडेड फंड प्रकारातील धनत्रयोदशीला एकूण २,२०० कोटी रुपयांचे व्यवहार झाले. यापैकी अनिल धीरुभाई अंबानी समूहातील वित्तीय सेवा क्षेत्रातील रिलायन्स म्युच्युअल फंडाच्या पदरी सर्वाधिक वाटा आल्याचे स्पष्ट होत आहे. एकाच दिवसातील ईटीएफ व्यवहाराचा एक हजार कोटी रुपयांचा आकडाही कंपनीने पहिल्यांदाच पार केला. रिलायन्स म्युच्युअल फंडाचा गोल्ड ईटीएफ क्षेत्रात बाजारहिस्सा यातून ६३ टक्के राखला गेला आहे. विविध १४ कंपन्यांद्वारे गोल्ड ईटीएफचे व्यवहार होतात. धनत्रयोदशीच्या दिवशी (११ नोव्हेंबर) १० ग्रॅम सोन्याचा दर ३२ हजार रुपये होता. ९९.५ टक्के शुद्धतेच्या प्रमाणपत्राच्या (एक यूनिट=एक ग्रॅम) रुपात हे व्यवहार होतात. सकाळी ११ ते दुपारी ३.३० च्या दरम्यान हे व्यवहार झाले.    

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा