करोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी संपूर्ण देशामध्ये लॉकडाउन सुरु आहे. त्याचा उद्योग-व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. भारतातील सर्वात मोठी कंपनी असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजने आपल्या बहुतांश कर्मचाऱ्यांच्या वेतनात १० ते ५० टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. कठिण परिस्थिती लक्षात घेऊन समूहाचे अध्यक्ष आणि भारतातील सर्वात धनाढय व्यक्ती मुकेश अंबानी यांनी स्वत:चे वेतन न घेण्याचा निर्णय घेतला आहे. इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिले आहे.

तेलापासून तंत्रज्ञानापर्यंत साम्राज्य पसरलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीकडून रोख रक्कमेच्या स्वरुपात दिला जाणारा वार्षिक बोनस आणि कामगिरीशी संबंधित असणारे प्रोत्साहनपर लाभ स्थगित करण्यात आले आहेत.  २५ मार्चपासून संपूर्ण देशामध्ये लॉकडाउन सुरु आहे. त्यामुळे मागणीमध्ये मोठया प्रमाणावर घट झाली आहे. कारखाने, कार्यालय बंद आहेत. हवाई प्रवास, ट्रेन पूर्णपणे बंद आहेत. लोकांच्या फिरण्यावर निर्बंध आहेत. एकूणच संपूर्ण अर्थचक्र ठप्प आहे.

सर्वच उद्योग समूहांना याची झळ बसली आहे. त्याचा परिणाम कर्मचाऱ्यांच्या वेतन कपातीमध्ये झाला आहे. रिलायन्सच्या हायड्रोकार्बनच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे. रिलायन्सच्या वेगवेगळया विभागाच्या प्रमुखांनी पगार कपातीच्या निर्णयाबद्दल कर्मचाऱ्यांना माहिती दिली आहे.

Story img Loader