शुक्रवारच्या भांडवली बाजारातील व्यवहारासह सप्ताहाची अखेर झाल्यानंतर रिलायन्स इंडस्ट्रिजकडून केजी-डी६ खोऱ्यांमध्ये नैसर्गिक वायू साठा सापडल्याचे वृत्त जाहिर झाले. येथील पूर्व किनारपट्टी भागातील साठय़ात सर्वात मोठे वायू संशोधनाची ही घटना रिलायन्ससाठी अख्खे व्यवसाय चित्र बदलण्यासारखी ठरण्याची चिन्हे आहेत. कंपनीमार्फत सध्या उत्पादन घेतले जात असलेल्या केजी-डी६ विहिरीमधील डी१ व डी३ पासून दोन किलोमीटर लांब आणि अवघ्या चार किलोमीटर खोल मोठय़ा प्रमाणात वायू साठा अवगत झाला आहे. भारतीय समुद्रात २ लाख कोटी क्युबिक फूट अशी गेल्या काही वर्षांतील एवढे मोठे उत्पादन प्रथमच झाले आहे. नव्या साठय़ाला डी-५५ असे नाव देण्यात आले आहे. यामुळे कंपनीचे वायू उत्पादन २०१८ पर्यंत ५ कोटी स्टॅन्डर्ड क्युबिक मीटर प्रती दिन पोहोचण्याच्या प्रक्रियेला वेग मिळणार आहे. कंपनीनेही सध्याच्या कमी वायू किंमती अतिरिक्त उत्पादन घेण्यास आडकाठी ठरतील, अशी भीती व्यक्त करून त्या अधिक वाढविण्याची इच्छा व्यक्त केली आहे. रिलायन्सबरोबर भारतातील वायू व तेल उत्खननात बीपी ही ब्रिटिश कंपनी भागीदार आहे. तिचा केजी-डी६मध्ये ३० टक्के हिस्सा आहे. तर निको या अन्य कंपनीचा १० टक्के हिस्सा आहे. उर्वरित ६० टक्क्यांवर रिलायन्सची मालकी आहे. रिलायन्स-बीपीद्वारे होणारे इंधन उत्खनन आणि महसुली विभाजनावरून सरकारबरोबर कंपनीचा संघर्ष सुरू आहे. याबाबत कॅगनेही हस्तक्षेप केला होता.
या वृत्ताने भांडवली बाजारात कंपनीचा समभागही गेल्या आठ महिन्यात प्रथमच तब्बल ५.१२ टक्क्यांनी वधारला. त्याला सोमवारी मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सवर ८२८.२५ रुपये मूल्य मिळाले. दिवसभरात कंपनीचा समभाग ५.६० टक्क्यांपर्यंत उंचावत होता. यावेळी त्याला ८३२ रुपये असा दिवसाचा सर्वोच्च भाव मिळत होता. दिवसअखेर ५ टक्क्यांहून अधिक प्रमाणात स्थिरावलेल्या समभाग मूल्यामुळे कंपनीचे बाजार भांडवलही २.६८ लाख कोटी रुपयांपर्यंत गेले. गुंतवणूकदारही यामुळे १३ हजार कोटी रुपयांनी श्रीमंत झाले. दिवसभरात कंपनीच्या ६.८१ लाख समभागांचे व्यवहार बाजारात झाले. दोन आठवडय़ापूर्वी ही संख्या निम्मी म्हणजेच ३.२७ लाख समभाग होती. मुंबई शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक सेन्सेक्समध्ये इन्फोसिससह रिलायन्स मोठे योगदान देतो. आजच्या कंपनी समभाग वधारणेच्या रुपात सेन्सेक्समधील ३२६ अंश वाढीत रिलायन्सचा हिस्सा तब्बल ८४.२० अंश होता.

रिलायन्सचे वायू क्षेत्रातील उत्पादन सतत घटत होते. पुरेसे वायू उत्खनन होत नसल्याने सध्याच्या वायू उत्पादनाचा प्रती ब्रिटिश वायू युनिट खर्च अधिक असल्याने या विहिरी बंद करणे भाग पडले असते या व्यतिरिक्त कंपनीने पुरेसे वायू उत्पादन न केल्याबद्दल सरकारला २०११-१२ साठी ७.८८ दशलक्ष डॉलर दंड भरला आहे. वायू विहिरीत अती खोल क्षेत्रात नवीन साठा सापडल्यामुळे पुरेसा वायू उपलब्ध असेल. यामुळे २०१५ ची रिलायन्सची मिळकत रु. २/- समभाग वाढणे अपेक्षित आहे.
’ अलोक देशपांडे,
तेल व वायू विश्लेषक, इलेन्ट्रा कॅपिटल.

Story img Loader