आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

घसरलेल्या तेल दराचा परिणाम; सर्वाधिक जीआरएमची नोंद

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने मंगळवारी ७,२१८ कोटी रुपयांच्या विक्रमी तिमाही नफ्याची नोंद करून, सध्या उद्योगक्षेत्रात सुरू असलेल्या वाईट तिमाही निकालनोंदीच्या प्रवाहाला खंड पाडला आहे. विश्लेषकांनी नफा वाढ अंदाजलीच होती, पण तिमाहीतील नफा साधारण ६,९५० कोटी रुपयांच्या आसपास राहील, हा बहुतांशांचा कयासही प्रत्यक्ष आलेल्या निकालाने थिटा ठरविला.

देशातील तेल क्षेत्रातील या सर्वात मोठय़ा खासगी कंपनीने तिमाहीतील महसूल ६०,८१७ कोटी रुपयांवर नेला आहे, आधीच्या तिमाहीत तो ५७,५६७ कोटी रुपये होता. उल्लेखनीय म्हणजे कंपनीची ग्रोस रिफायनिंग मार्जिन (जीआरएम) म्हणजे प्रतिपिंप कच्चे तेल शुद्धीकरणातून नफ्याचे प्रमाण हे या तिमाहीत ११.५० डॉलर असे सात वर्षांतील उच्चांक स्तरावर गेले आहे.

तिमाहीगणिक या गुणोत्तरात ८.५ टक्क्यांची वाढ झाली आहे. या बाबतीत जागतिक मानदंड असलेल्या सिंगापूर कॉम्प्लेक्ससाठी हेच गुणोत्तर या तिमाहीत सरासरी ६.३० डॉलर प्रतिपिंपावरून ८ डॉलर असे वाढले आहे.

एप्रिल ते डिसेंबर अशा नऊ महिन्यांत रिलायन्सने आपल्या क्षमतेचा पूर्ण वापर करून आजवरचे सर्वाधिक तेल उत्पादनही घेतले आहे.

पेट्रोरसायन व्यवसायाव्यतिरिक्त कंपनीच्या किरकोळ विक्री (रिलायन्स रिटेल) व्यवसायाने १८.७ टक्के अशी मोठी मुसंडी मारत ६,०४२ कोटींचा (आधीच्या ५,०९१ कोटींच्या तुलनेत) तिमाही महसूल नोंदविला आहे.

कंपनीच्या ‘रिलायन्स जिओ’ या ४जी सेवेचा कंपनीच्या १०,००० कर्मचाऱ्यांमार्फत अलीकडेच सुरुवातही झाली आहे. ही सेवा मार्च – एप्रिल २०१६ दरम्यान सादर होण्याची शक्यता आहे. तर किरकोळ विक्री दालनांची संख्या देशभरात ३७१ शहरांत ३,००० पर्यंत विस्तारली असल्याचे कंपनीने प्रसिद्धीपत्रकान्वये स्पष्ट केले आहे.

घसरलेले कच्च्या तेलाचे दर आणि पर्यायाने इंधनाच्या किमती यामुळे कंपनीच्या या व्यवसाय क्षेत्राने लक्षणीय वाढ दाखविली, जे तिमाही निकालातही प्रतिबिंबित झाले आहे. रिफायनिंग व्यवसायाने पुन्हा एकदा विक्रमी कामगिरीची नोंद केली आहे.

मुकेश अंबानी, अध्यक्ष, रिलायन्स इंडस्ट्रीज लि.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Reliance industries posts record quarterly profit of rs 67 0 crore in q