तमाम अर्थतज्ज्ञ, विश्लेषकांचे अंदाज मागे टाकत रिलायन्स इंडस्ट्रिजने तिमाही नफ्यातील वाढीसह तेल शुद्धीकरण व्यवसायातून होणारा लाभही सर्वोत्तम नोंदविला आहे. चालू आर्थिक वर्षांतील पहिल्या तिमाहीत ४.४ टक्के अधिक नफा कमावितानाच रिलायन्सने प्रति पिंपामागील डॉलररुपी इंधन लाभ गेल्या सहा वर्षांतील सर्वोत्तम असा नोंदविला आहे.
रिलायन्सने प्रति पिंप १०.४० डॉलर लाभ नफा तेल शुद्धीकरण व्यवसायाच्या जोरावर मिळविला आहे. चालू आर्थिक वर्षांतील पहिल्या तिमाहीतील हा लाभ आधीच्या तिमाहीतील १०.१ डॉलर प्रति पिंपपेक्षा अधिक आहे. आघाडीच्या अर्थवृत्त वाहिनीमार्फत करण्यात आलेल्या सर्वेक्षणात हा लाभ १० डॉलरच्याही खाली, ९.५० डॉलर प्रति पिंप अंदाजित होता. कंपनीने कमाविलेला लाभ हा गेल्या सहा वर्षांतील सर्वोच्च आहे.
तेल निर्मिती ते किरकोळ विक्री दालन साखळी चालविणाऱ्या देशातील आघाडीच्या या उद्योग समूहाने तेल व वायू शुद्धीकरण लाभ (जीआरएम-ग्रॉस रिफायनिंग मार्जिन) ३ टक्के अधिक राखला आहे. समूहाच्या इंधन उत्पादनाला जागतिक स्तरावर अधिक मागणी नोंदली गेली आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरातील गेल्या काही कालावधीतील प्रवास याबाबत कंपनीच्या पथ्यावर पडल्याचे समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी वित्तीय निष्कर्ष जारी करताना म्हटले आहे.
रिलायन्सने पेट्रोकेमिकल क्षमता तसेच शुद्धीकरण प्रक्रियेसाठी १२ अब्ज डॉलरची गुंतवणूक केली आहे. मात्र समूहाच्या उलाढालीत २३ टक्के घसरण नोंदली गेली आहे.
समूहाने शुक्रवारी भांडवली बाजारातील व्यवहार संपल्यानंतर तिमाही वित्तीय निष्कर्ष जारी केले. तरीही कंपनीच्या समभागाला सत्रात मुंबई शेअर बाजारात १.९ टक्के कमी भाव मिळत समभाग मूल्य १,०२५.०५ रुपयांवर स्थिरावले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रिलायन्स जिओ चाचणी अंतिम टप्प्यात
४जी तंत्रज्ञानावरील बहुप्रतिक्षित रिलायन्सची जिओ ही मोबाईल सेवा लवकरच अस्तित्वात येणार असून त्याबाबतची सर्व चाचणी अंतिम टप्प्यात असल्याचे अंबानी यांनी शुक्रवारी स्पष्ट केले. २०१६-१७ या आर्थिक वर्षांत रिलायन्स जिओ इन्फोकॉमचे पूर्णत: कार्यचलन होईल, असेही ते म्हणाले.
समूहाच्या नव्या दमाच्या रिलायन्स रिटेलनेही एप्रिल ते जून २०१५ तिमाहीत १७.५ टक्के वाढ नोंदविताना ४,६९८ कोटी रुपयांचा नफा कमाविला आहे. जून २०१५ अखेर रिलायन्स रिटेलची २१० शहरांमध्ये २,७४७ दालने झाली आहेत.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Reliance industries q1 profit