नैसर्गिक वायूच्या किमतीतील १ एप्रिल २०१४ पासून नियोजित दुपटीने होणारी वाढ निवडणूक आयोगाने आचारसंहिता सुरू असेपर्यंत रोखून धरली असली, तरी प्रति युनिट ८.३ डॉलर या वाढीव दरानेच खत कंपन्यांना वायुपुरवठा करण्याची आग्रही भूमिका रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने घेतली आहे. नवीन किंमत धोरण जेव्हा अमलात येईल, तेव्हा जुनी किंमत आणि नव्याने लागू झालेली किंमत यातील फरकाची रक्कम चुकती करण्याची हमी देत असाल, तरच वायुपुरवठा सुरळीत ठेवला जाईल, असे पत्रही खत कंपन्यांना रिलायन्सने धाडले आहे.
वायूच्या पुरवठय़ासाठी रिलायन्सने विविध खत कंपन्यांशी केलेला करार हा ३१ मार्च २०१४ रोजी संपुष्टात आला असून, नैसर्गिक वायुविषयक रंगराजन समितीने सुचविलेल्या किंमत सूत्रानुसार नवीन प्रति युनिट ८.३ अमेरिकी डॉलर या किमतीने या कराराचे नूतनीकरण १ एप्रिल २०१४ पासून होणार होते. परंतु निवडणूक आयोगाने त्याला हरकत घेतली आणि गेल्या आठवडय़ात केंद्रीय तेल व वायुमंत्र्यांच्या मध्यस्थीने झालेल्या बैठकीत तूर्त ४.२ डॉलर प्रति युनिट दराने खत कंपन्यांना वायुपुरवठा करण्याची रिलायन्सनेही तयारी दर्शविली होती.
तथापि ८ एप्रिलला खत कंपन्यांना पाठविलेल्या पत्रात, प्रति युनिट ४.२०५ डॉलर हा वायूचा दर ३१ मार्चपर्यंतच वैध होता, असे रिलायन्सने स्पष्टपणे नमूद करून, नवीन किंमतविषयक दोन्ही पक्षांनी मान्य केलेल्या सूत्राविषयी जानेवारीमध्ये अधिसूचना निघाली आणि ती राजपत्रातही प्रसिद्ध झाली आहे. त्यामुळे १ एप्रिलपासून सुधारित किंमत लागू होणे क्रमप्राप्त आहे, याकडे तिने खत कंपन्यांचे लक्ष वेधले आहे.
त्यामुळे १ एप्रिलपासून सुरू झालेल्या वायुपुरवठय़ाची किंमत ही ८.३ डॉलरच गृहीत धरावी आणि ही वाढीव किंमत चुकती केली जाण्याची हमी देत असाल तरच पुरवठा सुरळीत राहील, असा तिने इशारा दिला आहे.

Story img Loader