नैसर्गिक वायूच्या किमती ठरविण्यातील अनियमिततेबद्दल रिलायन्सच्या मुख्य प्रवर्तकांसह केंद्रीय तेलमंत्र्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याचे दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी दिलेल्या आदेशाचे कंपनीच्या समभागावर मंगळवारी विपरित परिणाम दिसले. तथापि भांडवली बाजार मात्र सप्ताहारंभीच्या घसरणीतून बाहेर आला. सेन्सेक्स २९.१० अंशवाढीसह २०,३६३.३७ वर निफ्टी ९.२५ अंशवधारणेसह ६,०६२.७० वर पोहोचला.
नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन भ्रष्टाचारविरोधी शाखेला रिलायन्सच्या कृष्णा खोऱ्यातील वायूच्या किमती निश्चितीत अनियमितता असल्याच्या ठपक्यावरून हे आदेश देण्यात आल्याचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी जाहीर करताच कंपनीचा समभाग मुंबई शेअर बाजारात १.५६ टक्क्यांनी घसरला, तर निफ्टीवरही हा समभाग १.७० टक्क्यांनी आपटला. व्यवहारात २.२६ टक्क्यांपर्यंत (रु. ८०३) आपटी नोंदविणारा कंपनीचा समभाग सत्रअखेरही सेन्सेक्सच्या दफ्तरी १.९६ टक्क्यांसह घसरत ८०५.५० रुपयांवर स्थिरावला. राष्ट्रीय शेअर बाजारात तो दिवसअखेर २.२१ टक्के घसरणीसह ८०३.७५ रुपयांपर्यंत खाली आला.
टाटा मोटर्स, इन्फोसिस, टाटा स्टील, एचडीएफसी यांच्या समभाग मूल्यातील वाढीने निर्देशांकाला साथ दिली. जानेवारीतील निर्यात वाढीमुळे कमी होत असलेल्या व्यापारी तुटीचे स्वागत या वेळी बाजारात होताना दिसले.
रुपयात द्विसप्ताह उच्चांकावर
एकाच व्यवहारात तब्बल २१ पैशांनी उंचावत भारतीय चलन रुपया डॉलरमागे मंगळवारी ६२.२२ या गेल्या दोन आठवडय़ांच्या उच्चांकाला जाऊन पोहोचले. जानेवारीतील व्यापारी तूट कमी होण्याचा परिणाम रुपयाच्या भक्कमतेत दिसले. दिवसअखेर त्यात ०.३४ टक्क्यांची वाढ नोंदली गेली. रुपयाने यापूर्वी २८ जानेवारीला एकाच व्यवहारात ५९ पैशांची झेप घेतली होती. तर यापूर्वी २३ जानेवारीला ६१.९३ या सर्वोच्च स्थानावर रुपया होता.

Story img Loader