रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे दूरसंचार क्षेत्रातील महत्त्वाकांक्षी पाऊल अर्थात ४ जी संचार सेवेला पुढील वर्षांपासून सुरुवात होईल, असे बुधवारी कंपनीचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी स्पष्ट केले. तब्बल १.८ लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे नियोजन जाहीर करताना, जगातील अव्वल ५० कंपन्यांच्या पंक्तीत जाऊन बसण्याचे लक्ष्यही त्यांनी जाहीर केले.
आपल्या ऊर्जा व्यवसायातून अधिकांश महसूल कमावणाऱ्या रिलायन्स इंडस्ट्रीजचे साम्राज्य गत काही काळात दूरसंचार, माध्यम आणि किरकोळ विक्रीसारख्या नव्या क्षेत्रांत दमदारपणे विस्तारले असून, मूळ तेल व वायू व्यवसायातून उत्तरोत्तर घटत आलेल्या उत्पन्नवाढीची कसर हे नवे उद्योग भरून काढत असल्याचेही आढळून येत आहे. परिणामी कंपनीच्या बुधवारी मुंबईत झालेल्या ४० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित भागधारकांमध्ये या नव्या व्यवसाय स्वारस्यांबाबतच उत्सुकता दिसून आली. कंपनीच्या व्यावसायिक कायापालटाचे द्योतक म्हणून, संचालक मंडळात मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी यांच्या वर्णीवरही भागधारकांनी या सभेत शिक्कामोर्तब केले. बाजार भांडवलाच्या दृष्टीने भारतातील या तिसऱ्या मोठय़ा कंपनीवर नीता अंबानी यांच्या रूपाने प्रथमच महिला संचालिकेची नियुक्ती झाली आहे.  
आधीच तीव्र स्पर्धा असलेल्या दूरसंचार क्षेत्रात रिलायन्सचे हे ४ जी पाऊल मोठे वादळ निर्माण करणारे ठरेल. २०१५ सालात ही बिनतारी ब्रॉडबॅण्ड सेवा देशभरातील ५,००० शहरात आणि दोन लाख १५ हजार गावांमध्ये विस्तारलेली दिसेल, असे अंबानी यांनी जाहीर केले. रिलायन्स जिओ या आपल्या दूरसंचार व्यवसाय स्वारस्यावर सुमारे ७०,००० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे नियोजन आपण आखले असल्याचे पुढे बोलताना अंबानी यांनी सांगितले आणि पुढे देशातील प्रत्येक म्हणजे सहा लाखांहून अधिक गावांपर्यंत या सेवेच्या विस्ताराचा मानसही त्यांनी स्पष्ट केला.
रिलायन्सने २०१० सालातच आपले दूरसंचार क्षेत्रात मुसंडीचे मनसुबे तत्कालीन सरकारने केलेल्या दूरसंचार परवान्यांच्या लिलावात ४ जी ध्वनिलहरींसाठी देशस्तरावर परवाना मिळविणारी एकमेव कंपनी ठरलेल्या ‘इन्फोटेल’चे ४,८०० कोटी रुपयांच्या मोबदल्यात अधिग्रहण करून जाहीर केले होते. त्या समयी विकसनशील अवस्थेत असलेल्या आणि अत्यंत नवख्या अशा या सेवेच्या पुरवठय़ासाठी गत चार वर्षांत आवश्यक ती पायाभूत रचना व सक्षमता प्राप्त करून, ती ग्राहकांच्या सेवेत दाखल करण्यास आपण सज्ज झालो असल्याचे आश्वासक उद्गार अंबानी यांनी बुधवारी काढले.

नीता अंबानीबद्दल स्वागत उद्गार!
रिलायन्सला बळकटी देणाऱ्या अनेकानेक उपक्रमांमध्ये नीता यांचा सिंहाचा वाटा राहिला आहे. जामनगर येथे जागतिक दर्जाची निवासी वसाहत असो वा या संकुलाच्या परिसंस्थेचा विकास असो, कार्यालयांना नवा तोंडावळा देणे, रिलायन्स रिटेलच्या ग्राहक संपर्क केंद्रांची रचना, आपला आरोग्य निगा क्षेत्रातील पुढाकार त्याचप्रमाणे धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूल, मुंबई इंडियन्स आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे रिलायन्स फाऊंडेशनच्या यशस्वी व्यवस्थापनात त्यांचा हात राहिला आहे. एक निपुण व्यक्तिमत्त्व आणि रिलायन्सच्या आगामी प्रगतिपथात मोलाची भर घालण्याची क्षमता असलेल्या नीता यांचे कंपनीच्या संचालक मंडळात सहर्ष स्वागत..’’
* मुकेश अंबानी – अध्यक्ष, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड

* २०१५ सालात देशभरातील ५,००० शहरे आणि  २ लाख १५ हजार गावांमध्ये ४ जी सेवेचा प्रारंभ
* ७०,००० कोटींच्या अतिरिक्त गुंतवणुकीत दूरसंचार सेवेचा विस्तार ६ लाख गावांपर्यंत
* पेट्रोकेमिकल्स उद्योगाची क्षमता वाढ, ऊर्जा व्यवसायाचा विस्तार, विक्री दालने उघडण्यासाठी आणि दूरसंचार सेवेसाठी १.८ लाख कोटी रु. गुंतविणार
* जागतिक कंपन्यांच्या फॉच्र्युन ५०० सूचीत सध्याचा १३५ वा क्रमांकांवरून पहिल्या ५० कंपन्यात मुसंडीचे लक्ष्य

Story img Loader