‘ओन्ली विमल’ म्हणून गाजलेली रिलायन्सची वस्त्र नाममुद्रा अखेर चिनी कंपनीला विकण्यात येत आहे. रिलायन्स इंडस्ट्रिजचे संस्थापक स्व. धीरुभाई अंबानी यांनी स्थापन केलेल्या या व्यवसायातील मोठा हिस्सा थोरले पुत्र मुकेश अंबानी यांनी शानडोन्ग रुई सायन्स अॅन्ड टेक्नॉलॉजी समूहाला विकण्याचा निर्णय घेतला आहे.
दूरचित्रवाहिनी व छापील माध्यमांचे जाळे नसतानाच्या ७० च्या दशकात केवळ ‘ओन्ली विमल’ या लक्ष वेधणाऱ्या ओळीने रिलायन्सची विमलची जाहिरात लक्ष वेधून घेत असे. स्त्री तसेच पुरुषांसाठीच्या वस्त्राची विविध उत्पादने याअंतर्गत तयार केली व विकली जात. अभिनेते कंवलजित, दीपक पराशर, कबीर बेदी तसेच क्रिकेटपटू रवी शास्त्री हे विमलच्या जाहिरातीत झळकले होते.
मुकेश व धाकटे बंधू अनिल अंबानी यांच्यात व्यावसायिक स्वतंत्रता येण्यापूर्वी अनिल यांच्या पत्नी टीना अंबानी या रिलायन्सचा वस्त्र व्यवसाय हाताळत असे. २००० च्या सुमारास समूह विभाजनानंतर हा व्यवसाय मुकेश यांच्या अखत्यारित गेला व त्यांचे नातेवाईक निखिल मेसवानी यांची देखरेख त्यावर होती.
विमल नाममुद्रा विकण्याची चर्चा गेल्या दीड वर्षांपूर्वी सुरू झाली होती. हा व्यवसाय अंशत: अथवा पूर्ण विकण्याबाबत निर्णय होत नव्हता. मात्र मध्यंतरी कंपनीने उत्पादनांमध्ये बदल करत त्यातील सातत्य कायम ठेवले. पुरुषांसाठीच्या तयार कपडे निर्मितीतही ही कंपनी उतरली. व्यवसायातील ६० टक्के महसूल हा विदेशातून येतो.
नव्या निर्णयानुसार, विमल नाममुद्रेवर रिलायन्सचा ५१ टक्के मालकी हक्क राहणार असून उर्वरित ४९ टक्के हिस्सा चीनच्या कंपनीचा असेल. यासाठी उभयतांची नवी सहयोगी कंपनीही स्थापन करण्यात येणार आहे. शानडोन्ग रुई ही ३ अब्ज डॉलरची महसुली कंपनी आहे. तिची जिओर्जिआ गुल्लिनी ही नाममुद्रा भारतात काही प्रमाणात दिसते. तर रिलायन्सची एकूण उलाढालीपैकी ०.३ टक्के विमलमध्ये आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा