सात वर्षे जुने रिलायन्स पेट्रोलियम लि.चे रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये विलीनीकरणाच्या प्रसंगी अंतस्थांकडून घडलेल्या कथित ‘इनसाइडर ट्रेडिंग’ व्यवहाराचे रोखे पुनर्विचार लवादा(सॅट)पुढील प्रकरणावरील नियोजित सुनावणी रिलायन्सच्या वकिलाच्या गैरहजेरीमुळे १६ एप्रिलपर्यंत लांबली आहे. ‘सेबी’ने ‘सहमती’द्वारे प्रकरण निकाली काढण्याचा रिलायन्सचा अर्ज फेटाळल्यानंतर, अर्ध-न्यायिक लवादापुढे हे प्रकरण २०१० सालापासून प्रलंबित आहे. वैद्यकीय कारणाने रिलायन्सचे वकील जनक द्वारकादास यांनी अनुपस्थितीचा अर्ज केला. त्याला स्वीकृती देत लवादाने पुढील सुनावणीसाठी १६ एप्रिल २०१४ ही तारीख निश्चित केली. रिलायन्स पेट्रोलियमच्या रिलायन्स इंडस्ट्रीजमधील विलीनीकरण अधिकृतपणे घोषित होण्याआधी, माहीतगार असलेल्या कंपनीच्या उच्चपदस्थ अंतस्थांनी समभागांच्या विक्रीचे व्यवहार करून आर्थिक लाभ कमावल्याचा ‘सेबी’चा आरोप आहे.

Story img Loader