अंबानी यांचा ‘रिलायन्स जिओ जागर’
रिलायन्स जिओ या नव्या आर्थिक वर्षांत प्रत्यक्षात येणाऱ्या दूरसंचार सेवा कंपनीच्या जोरावर देशातील विद्यमान वेगापेक्षा तब्बल ८० टक्के अधिक वेग देण्याचे आश्वासन रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी दिले आहे.
रिलायन्सची जिओ ही जगातील सर्वात मोठी ‘डिजिटल स्टार्टअप’ कंपनी ठरणार असल्याचा विश्वास व्यक्त करतानाच या उपक्रमासाठी समूहाने १.५० लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केल्याचेही अंबानी यांनी बुधवारी ‘फिक्की फ्रेम्स’च्या मंचावरून जाहीर केले.
मनोरंजन-माध्यम व उद्योग यांची सांगड घालणाऱ्या ‘फिक्की फ्रेम्स’च्या २०१६ मधील पर्वाचे उद्घाटन बुधवारी मुंबईत झाले. केंद्रीय दूरसंचार मंत्री रवि शंकर प्रसाद, स्टार इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय शंकर आदी यावेळी उपस्थित होते.
मुकेश अंबानी यांच्या दूरसंचार क्षेत्रातील पुनप्र्रवेशासाठी निमित्त ठरणाऱ्या रिलायन्स जिओची प्रत्यक्षातील सेवा येत्या आर्थिक वर्षांच्या सुरुवातील भारतात सुरू होईल. ४जी दूरसंचार सेवा डिसेंबर २०१५ मध्ये अपेक्षित असताना सध्या तिची समूहांतर्गत कर्मचाऱ्यांमध्ये सुरू असलेली चाचणी यानंतर अन्य ग्राहकांसाठीही उपलब्ध होईल.
अंबानी म्हणाले की, देशातील १.३० अब्ज लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी आपण कटिबद्ध असून रिलायन्स जिओमुळे भारतातील मोबाईल इंटरनेटचे स्थान सध्याच्या १५० व्या स्थानावरून थेट १० व्या क्रमांकावर पोहोचेल.
पदार्पणाच्या पहिल्या टप्प्यात विद्यमान रचनेपेक्षा ८० टक्क्य़ांपर्यंत तर वर्षभरात ९० टक्क्य़ांपर्यंत वेगवान इंटरनेट सेवा आपल्या कंपनीद्वारे दिली जाईल, असेही त्यांनी सांगितले. सेवा प्रत्यक्षात आल्याच्या पहिल्या दिवसापासून देशातील ७० टक्के भागापर्यंत ती उपलब्ध करून दिली जाईल, असे त्यांनी सांगितले.

‘टीआरपी’ पद्धतीवर प्रसाद यांची नाराजी
दूरचित्रवाणीवर पाहिले जाणाऱ्या कार्यक्रमांचे मानांकन करण्याच्या प्रक्रियेत (टीआरपी) शिरण्याचा सरकारचा कोणाताही विचार नसल्याचे स्पष्ट करत केंद्रीय मंत्री प्रसाद यांनी याबाबतच्या सध्याच्या मापकपद्धतीबाबत नाराजी व्यक्त केली. केवळ काही हजारो डब्बे नेमका कार्यक्रम खूपच चांगला आणि अन्य एखादा खूपच वाईट, असे कसे ठरवू शकतात, अशा शब्दात त्यांनी सध्याच्या यंत्रणेबाबत आक्षेप नोंदविले. दूरचित्रवाणीवरील कार्यक्रमांची नेमकी दर्शकसंख्या मापन करणारी संशोधनाधारित पद्धती विकसित करण्यासाठी या क्षेत्रातील सर्वांनी सहकार्य करण्याची अपेक्षा व्यक्त केली.

Story img Loader