मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स जिओ इन्फोकॉमने ४९’एमबी’ या वेगवान स्पीडने इंटरनेट सेवा पुरवण्याची योजना आखलीय. म्हणजे सध्याच्या ३ जी इंटरनेट स्पीडच्या तुलनेत रिलायन्स जिओ पुरवणार असलेल्या इंटरनेट सेवेचा वेग हा १० ते १२ पट जास्त असणार आहे. अर्थात रिलायन्स जिओची सेवा ही ४ जी कॅटेगरीतील असणार आहे.
इंटरनेट सेवेच्या वेगासाठी सध्या एबीपीएस म्हणजे मेगा बाईट पर सेकंद हे एकक वापरलं जातं. रिलायन्स जिओ ४९ एमबीपीएस या वेगाने डाऊनलोड तर ८ एमबीपीएस या स्पीडने अपलोड सुविधा देणारी इंटरनेट सुविधा पुरवणार आहे. हे सर्व नव्या ४ जी मुळे शक्य होणार आहे. ४ जी स्पीडमुळे पूर्ण लांबीचा म्हणजे ६०० मेगाबाईटचा चित्रपट तुम्ही फक्त दोन मिनिटात तुमच्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करू शकता.
रिलायन्स जिओच्या वतीने जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, रिलायन्स जिओ सध्या ४ जी इंटरनेट सेवेची चाचणी घेत आहे. त्यामध्ये त्यांना ४९ एमबीपीएस चा डाऊनलोड आणि ८ ते ९ एमबीपीएस अपलोड स्पीड मिळत आहे. प्रत्यक्षात रिलायन्सची यंत्रणा ११२ एमबीपीएस स्पीड देण्यासाठी सुसज्ज असल्याचंही या प्रसिद्धीपत्रकात स्पष्ट करण्यात आलं आहे.
रिलायन्स जिओ फक्त मोबाईल फोनसाठीच ४ जी इंटरनेट सुविधा पुरवणार नाही तर घराघरातील टीव्ही सेटलाही ४ जी स्पीडने इंटरनेट पुरवणं शक्य होणार आहे.
रिलायन्स जिओ मोबाईल आणि टीव्ही सेटबरोबरच लोकांना घरसबसल्या अतिवेगवान इंटरनेट कनेक्शनही उपलब्ध करून देणार आहे. त्यासाठी रिलायन्स कस्टमर प्रीमाईस इक्विपमेंट स्थआपित करणार आहे. हे इक्विपमेंट आपल्या परिसरातील मोबाईल टॉवरप्रमाणेच असतील. या कस्टमर प्रीमाईस इक्विपमेंटपासून रिलायन्स जिओची इंटरनेट सेवा घेणाऱ्या प्रत्येक घरात ऑप्टिकल फायबर केबलने इंटरनेट सेवा पुरवली जाईल. त्या घराच्या परिसरात यामुळे लोकल वाय-फाय सुविधाही देण्याची तयारी रिलायन्स जिओने केलीय. म्हणजे तुम्हाला रिलायन्सच्या ४ जी इंटरनेट सेवेशी जोडलेल्या कॉम्प्युटर किंवा टीव्हीसमोर बसण्याची आवश्यकता नाही. तर तुमच्या घरात कुठेही बसून तुम्ही इंटरनेट सेवेशी स्वतःला कनेक्ट करू शकता.
तसंच इंटरनेट आणि टीव्ही सेवा म्हणजे आयपीटीव्ही सेवा पुरवण्यासाठीचे खास सेट टॉप बॉक्सही रिलायन्स जिओ आपल्या ग्राहकांना पुरवणार आहे. या ४ जी इंटरनेट क्रांतीमुळे रिलायन्सने टीव्ही वितरण, इंटरनेट आणि मोबाईल अशा सेवा क्षेत्रात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच रिलायन्स जिओची वेगवान इंटरनेट सेवा तुम्हाला फोन सेवा पुरवेल, शिवाय तुमचा टीव्ही सुरू करेल… एवढंच नाही तर तुमच्या स्मार्टफोनवरही टीव्ही पाहण्याची सुविधा उपलब्ध करून देईल.
रिलायन्स जिओने टीव्ही सॅटेलाईट वितरण क्षेत्रात म्हणजे डीटीएचमध्ये आतापर्यंत १५० पेक्षा जास्त चॅनेल्सबरोबर सहकार्य करार केला आहे. रिलायन्सच्या जिओच्या प्रस्तावित टीव्ही सेट टॉप बॉक्सने पाहता येणाऱ्या टीव्ही चॅनेल्सची संख्या लवकरच आणखी वाढणार आहे.
मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स जिओने ४ जी सेवा देशभरात पुरवण्यासाठी अलीकडेच भारती एअरटेल आणि अनिल अंबानी यांच्या रिलायन्स इन्फोकॉम सोबत सहकार्य करार केला आहे. या करारानुसार रिलायन्स जिओ या दोन्ही कंपन्याची ओएफसी आणि मोबाईल टॉवर्स वापरणार आहे
रिलायन्स जिओ इन्फोकॉमचा ४जी नेटवर्क..
मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स जिओ इन्फोकॉमने ४९'एमबी' या वेगवान स्पीडने इंटरनेट सेवा पुरवण्याची योजना आखलीय. म्हणजे सध्याच्या ३ जी इंटरनेट स्पीडच्या तुलनेत रिलायन्स जिओ पुरवणार असलेल्या इंटरनेट सेवेचा वेग हा १० ते १२ पट जास्त असणार आहे
First published on: 08-01-2014 at 07:13 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Reliance jio plans to launch 4g broadband services by march