गेल्या सहा महिन्यांत बाजाराचा निर्देशांक – सेन्सेक्स जबरदस्त वधारला आहे. डिसेंबरमध्ये त्याने नवीन सार्वकालिक उच्चांक दाखविला आणि गुरुवार व शुक्रवार असे गेले सलग दोन दिवस त्याने या उच्चांकालाही मागे टाकणारी मजल मारली, पण ‘सेन्सेक्स’मध्ये सर्वाधिक मूल्यभार असलेला आणि आजवरच्या प्रत्येक तेजीचे प्रभावी नेतृत्व करणाऱ्या ‘रिलायन्स’ला मात्र आश्चर्यकारक गतिरोध जडला आहे. बाजारात सध्या निवडणूक-पूर्व तेजी सुरू आहे. १६ व्या लोकसभेसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर तिने तेजतर्रार वेग पकडला. अर्थात या निवडणुकीचा निकाल काय येईल, याबद्दलचे बाजाराचे अंदाज मात्र एकमुखी स्पष्ट दिसतात. त्यामुळे देशभरात सत्ताबाजार गरम झाला असताना, केंद्रात येणाऱ्या नव्या संभाव्य सरकारात कुणाचे पारडे जड राहील याचे अनुमान बांधत समभाग बाजारात गरमागरमी स्वाभाविक आहे. पण यात ‘रिलायन्स’ची पिछाडी नजरेत भरणारी आहे. दोन्ही अंबानी बंधूंच्या गेल्या काही वर्षांतील चाल आणि चाली चुकल्याचे हे द्योतक म्हणायचे काय?
गेल्या सहा महिन्यांचा वेध घेतल्यास सेन्सेक्सचा २८ ऑगस्ट २०१३ रोजी स्तर १७,४४८ असा होता. (त्यापुढे सप्टेंबरमध्ये रिझव्‍‌र्ह बँकेची धुरा रघुराम राजन यांच्याकडे यावी आणि बाजाराने तेव्हापासून कलाटणी घ्यावी असा हा योग) तो गत सालातील सेन्सेक्सचा तळ होता. त्या तळातून आजच्या घडीपर्यंत सेन्सेक्स ४,४७१ अंशांनी (जवळपास २६ टक्क्य़ांनी) उसळला आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही निर्देशांकात समाविष्ट बहुतांश समभागांनी आपले वार्षिक तसेच सार्वकालिक उच्चांकही केव्हाच पिछाडीवर टाकले आहेत, अपवाद फक्त ‘रिलायन्स’ समभागांचा (तक्ता पाहा!), हे सर्वच समभाग त्यांच्या सार्वकालिक उच्चांकापासून कैकयोजनेच्या दूर आहेत. गेल्या सहा महिन्यांत तर बाजारअग्रणी रिलायन्स इंडस्ट्रीजला जेमतेम १० टक्क्य़ांची वाढही शक्य झालेली नाही. गेल्या दोन दिवसांतील ४ ते १० टक्क्य़ांची वाढ जमेस धरूनही, अनेक ‘रिलायन्स’ समभागांना तर त्यांच्या सहा महिन्यांपूर्वीची भावपातळीही सांभाळता आलेली नाही.
बाजारात सध्या विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार (एफआयआय)कडून डॉलर-पौंडांची उत्साही उधळण सुरू असून, त्यांचा खरेदीचा जोर कायम आहे. उदयोन्मुख बाजारांमध्ये या मंडळींचा सर्वाधिक भर हा भारताच्या भांडवली बाजारावरच असल्याचे गेल्या काही महिन्यांत त्यांच्याकडून झालेल्या गुंतवणुकीतून दिसून येतो. पण लक्षणीय बाब म्हणजे देशी संस्थात्मक गुंतवणूकदार हे कुंपणावर बसून प्रेक्षकाच्या भूमिकेत आहेत, तर काही जण विक्री करून नफा पदरी पाडून घेत आहेत. सामान्य गुंतवणूकदारांचे म्हणाल तर तो काठावरच राहिला आहे. त्याने यापुढेही सबुरीनेच घ्यावे. धीर धरा, खरेदीची संधी नक्कीच चालून येईल.
शिफारस: अर्थव्यवस्थेने कलाटणी घेतल्यास लाभार्थी ठरतील असे अनेक समभाग गेल्या दोन आठवडय़ांपासून भाव-गती दाखवीत आहेत. त्यात एबीबी निश्चितच चमकदार कामगिरी करीत आहे. गेल्या काही दिवसांत तो ३४%वाढला असला तरी आणखी वाढीला वाव आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा