परवाना रद्द झालेल्या पेण अर्बन बँकेच्या खातेदारांसाठी एक दिलासा देणारी बातमी आहे. आत्यंतिक गरजू बँकेच्या ‘हार्डशिप’ खातेदारांना बंद करण्यात आलेले निधीचे वितरण पुन्हा सुरू होण्याबाबत ठोस हालचाली सुरू झाल्या आहोत. त्यामुळे अडचणीत असलेल्या ठेवीदारांना काही स्वरूपात ठेवीतील रक्कम मिळू शकणार आहे.
पेण अर्बन बँकेतील ठेवीदारांना अडचणीच्या काळात तसेच आजारपणावरील खर्चासाठी हार्डशिप निधीतून पैसे दिले जात होते. मात्र रिझव्‍‌र्ह बँकेच्या आदेशानंतर या निधीचे वितरण थांबविण्यात आले होते. याला ठेवीदार संघर्ष समितीने तीव्र आक्षेप घेतला होता. नुकत्याच झालेल्या विधिमंडळ अधिवेशनात मुंबईत आंदोलन करून यावर सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता. अखेर सहकार खात्याने हस्तक्षेप करून ‘हार्डशिप खात्यां’अंतर्गत मंजूर निधीच्या वितरणाला मान्यता मिळाली आहे. याचा फायदा जवळपास ६०० ठेवीदारांना होणार आहे. ठेवीदारांना त्यांच्या ठेवीच्या प्रमाणात ठराविक रक्कम दर महिन्याला मिळू शकणार असल्याचे ठेवीदार संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष नरेन जाधव यांनी सांगितले.
 शिक्षण, लग्नकार्य, औषधोपचार, कर्जाची परतफेड वगैरे गरजा लक्षात घेऊन हार्डशिप खात्यांसाठी प्राप्त अर्ज स्वीकारून ते मंजुरीसाठी रिझव्‍‌र्ह बँकेला पाठवावेत, अशा सूचना सहकार आयुक्तांनी प्रशासकांना केल्या आहेत. त्याचबरोबर मुदत संपलेल्या कर्जदार आणि जामीनदारांच्या ठेवी त्यांच्या कर्जखात्यात वर्ग करण्यासाठी रिझव्‍‌र्ह बँक आणि डीसीआयजीसीची प्रत्येक प्रकरणात स्वतंत्र परवानगी घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहे. या निर्णयामुळे कर्जदारांच्या आणि जामीनदारांच्या बँकेतील ठेवी कर्जाच्या रूपात वसूल करणे शक्य होणार आहे. त्यामुळे कर्जवसुलीला चालना मिळेल असा विश्वास ठेवीदार संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष नरेन जाधव यांनी व्यक्त केला.