नागरी सहकारी बँकिंग क्षेत्रात १९१५ सालापासून कार्यरत असलेल्या आणि दादर येथे मुख्यालय असलेल्या सीकेपी को-ऑपरेटिव्ह बँकेच्या काही विशिष्ट व्यवहारांवर र्निबध लादत असल्याचे रिझव्‍‌र्ह बँकेने सोमवारी जाहीर केलेल्या पत्रकाद्वारे स्पष्ट केले. बँकिंग नियमन कायद्याच्या कलम ३५ अ आणि उपकलम (१) अन्वये ही कारवाई करण्यात आली असून, सीकेपी बँकेचा बँकिंग परवाना रद्दबातल केल्याचा अर्थ याद्वारे काढला जाऊ नये, असेही रिझव्‍‌र्ह बँकेने स्पष्ट केले आहे.
रिझव्‍‌र्ह बँकेच्या र्निबधानुसार, सीकेपी बँकेच्या बचत खात्यात, चालू खात्यात अथवा अन्य ठेव खात्यात जमा शिलकीतून ठेवीदारांना एक हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम काढता येणार नाही. त्याचप्रमाणे बँकेला नवीन कर्ज वितरण आणि कर्जाचे नूतनीकरण करता येणार नाही. शिवाय कोणताही गुंतवणुकीचा निर्णय घेता येणार नाही अथवा ठेवी स्वीकारून दायित्वात भर घालता येणार नाही. बँकेच्या संचालक मंडळाने ताळेबंदातील अनियमिततेसंबंधी शुक्रवारी रिझव्‍‌र्ह बँकेच्या नागरी सहकारी विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन, योग्य तो खुलासा केला होता. त्याबाबत रिझव्‍‌र्ह बँकेचे समाधान झाल्याचेही आढळून आले. मात्र त्या दिवशी संध्याकाळीच रिझव्‍‌र्ह बँकेकडून र्निबधांचा बडगा बँकेवर उगारण्याचे फर्मान निघाले, असे बँकेतील उच्चपदस्थाकडून सांगण्यात आले.
सीकेपी बँकेच्या मुंबई आणि ठाणे जिल्ह्य़ातील आठ शाखा कार्यरत असून, सध्याच्या घडीला सुमारे पावणेसहा लाख खातेदार व सभासद आहेत. पुढच्या वर्षी बँकेच्या स्थापनेचे शतकमहोत्सवी वर्ष साजरे करण्याच्या योजना संचालक मंडळाने आखल्या होत्या. ३० एप्रिल २०१४ अखेर बँकेच्या एकूण ठेवी ८२४.२८ कोटी रुपये असून, बँकेने एकूण ६१२.५२ कोटींचे कर्ज वितरित केले आहे. बँकेच्या दादरमध्ये  विजयनगर आणि एस. बी. मार्ग अशा दोन, विलेपार्ले, चेंबूर, गोराई, तसेच ठाण्यात दोन व डोंबिवली येथे एक शाखा कार्यरत आहे.

Story img Loader