देशभरातील बँकांनी २००५ पूर्वीच्या चलनी नोटा लोकांकडून स्वीकारून त्या बदल्यात नव्या नोटांचे वितरण त्वरेने सुरू करावे, असे आदेश रिझव्‍‌र्ह बँकेने शुक्रवारी जारी केले. येत्या १ एप्रिलपासून २००५ पूर्वीच्या नोटांचा व्यवहारात वापर बंद करण्याचे फर्मान दोन दिवसांपूर्वी काढणाऱ्या रिझव्‍‌र्ह बँकेने अशा नोटांचे प्रमाण लक्षणीय नसल्याचे आज सांगितले. लोकांनी आपल्या सोयीनुसार बँकांच्या शाखांमध्ये जाऊन नोटांची अदलाबदल करून घ्यावी, असे रिझव्‍‌र्ह बँकेने प्रसिद्धीपत्रकाद्वारेआवाहन केले. जुन्या चलनी नोटा व्यवहारांतून काढून घेण्याची सामान्य आंतरराष्ट्रीय पद्धत असून, सुरक्षाविषयक वैशिष्टय़ांचा अंतर्भाव अल्प स्वरूपात असलेल्या २००५ पूर्वीच्या नोटा रद्दबातल करण्याचे पाऊल त्यानुसारच टाकले गेले आहे. १ जुलै विहित मुदतीनंतरही अशा नोटा कुणाकडे असतील तर असे ग्राहक त्यांचे ज्या बँकेत खाते आहे तेथे जाऊन त्या बदलून घेऊ शकतील, असेही रिझव्‍‌र्ह बँकेने आज स्पष्ट केले. कालच गव्हर्नर रघुराम राजन यांनीही आगामी सार्वत्रिक निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर हा निर्णय घेतला नसल्याचे स्पष्ट केले आहे.