कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेसाठी गुंतवणुकीचे काही निकष सुलभ करतानाच या संघटनेकडे असलेल्या पाच लाख कोटी रुपयांच्या निधीपैकी विशिष्ट रक्कम शेअर बाजारात गुंतविण्यास मात्र अटकाव करण्यात आला आहे. केंद्रीय मजूर मंत्रालयाने एका अधिसूचनेद्वारे यासंबंधी आदेश जारी केला आहे.
याद्वारे बँका व वित्तीय संस्थांनी जारी केलेल्या रोख्यांमध्ये भविष्य निर्वाह निधी संघटनेला आपल्याकडील निधीपैकी ५५ टक्के रक्कम गुंतविण्यास अनुमती देण्यात आली आहे. याआधी, २००३ च्या जुलै महिन्यामध्ये जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार, भविष्य निर्वाह निधी संघटनेला आपल्याकडील निधीपैकी ३० टक्के रक्कम गुंतविता येत असे. खासगी क्षेत्रातील भविष्य निर्वाह निधीच्या विश्वस्तांना सदर तत्त्वे लागू होणार नसून त्यांच्यासाठी स्वतंत्र अधिसूचना जारी करण्यात येणार आहे.
भविष्य निर्वाह निधीमधील निधी शेअर बाजारातील  गुंतवणुकीसाठी उपलब्ध व्हावा म्हणून अर्थमंत्रालय दीर्घकाळापासून प्रयत्नशील आहे. मात्र, शेअर बाजारातील गुंतवणुकीची एकूण स्फोटक परिस्थिती बघून विविध कामगार संघटनांनी या प्रस्तावास कडाडून विरोध केला आहे. त्यामुळे भविष्य निर्वाह निधी संघटनेने या पर्यायाचा विचार केला नव्हता. नंतर २००५ मध्ये पाच टक्के तर २००८ मध्ये १५ टक्के गुंतवणुकीला मान्यता देण्यात आली होती.

Story img Loader