महागाई दर घसरला असला तरी अन्नधान्यांच्या वाढत्या दराबद्दल चिंता व्यक्त करत गुंतवणूकदारांनी ‘सेन्सेक्स’ला पुन्हा दोन दिवसांच्या पिछाडीवर आणून ठेवले. गुरुवारी शतकी घसरणीसह मुंबई निर्देशांक १९,५०० च्याही खाली आला आहे. तर ‘निफ्टी’ही ३६ अंश घसरणीमुळे ५,९०० च्या खाली आला आहे.
कालपर्यंत सलग दुसऱ्या सत्रात तेजी नोंदविणाऱ्या व्यवहारावर भांडवली बाजाराची आजची सुरुवातही वधारणेने झाली. मात्र ती दिवसअखेपर्यंत कायम राहू शकली नाही. गेल्या दोन सत्रात ‘सेन्सेक्स’ने १४७ अंशांची वाढ नोंदविली आहे. असे करताना मुंबई निर्देशांक १९,५०० च्या पुढे गेला होता. आजच्या घसरणीने तो पुन्हा खाली आला आहे. स्पेक्ट्रम थकबाकीमुळे भारती एअरटेल तर फारसे आशादायक वित्तीय निष्कर्ष नसल्यामुळे स्टेट बँकेसारख्या समभागांची विक्री झाली. दोन्ही समभागांचे मूल्य अनुक्रमे ४.२ आणि १.८ टक्क्यांनी घसरले. याशिवाय विप्रो (-३.३३%), मारुती सुझुकी (-३.३०%) यांनीही घसरण नोंदविली. तर रिलायन्स (-२.६३%), लार्सन अ‍ॅन्ड टुब्रो (-२.७२%) यांचे समभागही घसरले. हिंदुस्थान युनिलिव्हर, गेल इंडिया, एचडीएफसी बँक, टाटा स्टील, टीसीएस, कोल इंडिया, इन्फोसिस हे समभाग वधारले.