नवी मुंबई : महसुलातील गळती रोखण्यासाठी कर अधिकाऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची साधने देऊन प्रशिक्षित करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बुधवारी नवी मुंबईत केले. त्यांच्या हस्ते केंद्रीय अप्रत्यक्ष कर तसेच सीमाशुल्क मंडळाच्या अखत्यारीतील मुंबई प्रदेश केंद्रीय वस्तू आणि सेवा कर विभागात कार्यरत अधिकारी आणि कर्मचारी वर्गासाठी नवी मुंबईत खारघर येथे उभारण्यात आलेल्या ‘केंद्रीय जीएसटी परिसर’ या निवासी प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले.
कर चुकवेगिरीसारख्या फसवणुकीच्या घटनांचा शोध घेण्यासाठी कर अधिकाऱ्यांना प्रगत प्रशिक्षणाची गरज असून देशातील विविध भागांमध्ये लवकरच असे प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येतील. कर चुकवेगिरीसारख्या घटनांचा शोध घेण्यासाठी कृत्रिम प्रज्ञा (एआय), विदा विश्लेषण (डेटा अॅनालिटीक्स), इंटरनेट ऑफ थिंग्स (आयओटी) तसेच अशा इतर प्रगत तंत्रज्ञानांचा अधिक चांगल्या प्रकारे वापर करून घेण्याची आवश्यकता सीतारामन यांनी व्यक्त केली. तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांना प्रशिक्षणाची जबाबदारी सोपवता येऊ शकते आणि याबाबत केंद्रीय महसूल सचिव तरुण बजाज आणि केंद्रीय अप्रत्यक्ष कर मंडळाचे (सीबीआयसी) अध्यक्ष विवेक जोहरी यांच्याशी चर्चादेखील झाली असल्याचे त्यांनी सांगितले. यातून महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन नोकरीतील ताण कमी होण्यासदेखील मदत मिळू शकेल, असा त्यांनी विश्वास व्यक्त केला.
सीबीआयसीच्या कामगिरीबद्दल बोलताना सीतारामन म्हणाल्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वस्तू आणि सेवा कराच्या वाढत्या महसुलाबद्दल कौतुक केले आहे. सरकारी संस्थादेखील खासगी क्षेत्राच्या स्पर्धेत उत्तम कामगिरी करू शकतात हेच यातून सिद्ध होते. कर अधिकाऱ्यांनी म्हणूनच अधिक महसूल मिळविण्यासाठी प्रयत्न करावा, असे त्यांनी आवाहन केले.