सावरणारी महागाई आणि वाढलेले औद्योगिक उत्पादन या पाश्र्वभूमीवर रिझव्‍‌र्ह बँकेकडून व्याजदर कपातीची आशा बाळगणाऱ्या उद्योग क्षेत्राने यंदा योग्य स्थिती असल्याचे मत नोंदविले आहे. भारतीय औद्योगिक महासंघाचे (सीआयआय) महासंचालक चंद्रजीत बॅनर्जी यांच्या म्हणण्यानुसार, रिझव्‍‌र्ह बँकेने गेल्या अनेक कालावधीपासून स्थिर व्याजदराचे धोरण अनुसरले आहे. गुंतवणूक आणि मागणी वाढण्यासाठी मात्र आता धोरण बदलण्याची गरज आहे. ‘फिक्की’ या अन्य एका उद्योग संघटनेचे सरचिटणीस ए. दिदार सिंग यांनीही महागाई दर समाधानकारक स्थितीत असल्याने उद्योगाला हातभार लागणारी कृती व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. सप्टेंबरमध्ये एकूण औद्योगिक उत्पादन दर वधारला असला, तरी ग्राहकोपयोगी वस्तू क्षेत्राची वाढ नकारात्मक राहिली आहे; तेव्हा या क्षेत्राला हातभार लावण्यासाठी रिझव्‍‌र्ह बँकेच्या व्याजदर कपातीच्या सहकार्याची आवश्यकता आहे, असेही दिदार सिंग म्हणाले.
व्याजदर निश्चितीसाठी रिझव्‍‌र्ह बँकेकडून अवलोकन केला जाणारा महागाई दर यंदा किमान स्तरावर येऊन ठेपला आहे. एकाच आठवडय़ात किरकोळ तसेच महागाई दर कमी झाल्याची आकडेवारी स्पष्ट झाल्याने मध्यवर्ती बँकेच्या येत्या महिन्यात होणाऱ्या पतधोरणात व्याजदर कपातीची उद्योग क्षेत्राची अपेक्षा उंचावली आहे. २ डिसेंबर रोजी हे पतधोरण जाहीर होणार आहे. गव्हर्नरपदाचा एक वर्षांचा कालावधी पूर्ण करणाऱ्या रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांनी यांनी यापूर्वी चार वेळा व्याजदरात वाढ केली आहे. तर जानेवारी २०१४ पासून हे दर स्थिर आहेत. रिझव्‍‌र्ह बँकेने जानेवारी २०१५ पर्यंत ८, तर पुढील वर्षभरात ६ टक्क्य़ांपर्यंतच्या व्याजदराचे लक्ष्य निर्धारित केले आहे.
महागाई दर कमी होत असतानाच सप्टेंबरमधील औद्योगिक उत्पादनाचा दरही उंचावला आहे. निर्मिती आणि भांडवली वस्तू उत्पादनांच्या जोरावर सप्टेंबरमध्ये औद्योगिक उत्पादन दर २.५ टक्के या गेल्या तिमाहीतील उच्चांकी टप्प्यावर पोहोचला आहे. २०१३-१४ आर्थिक वर्षांत या क्षेत्राने ४.७ टक्के दर नोंदिवला आहे.
गेल्या एकूण आर्थिक वर्षांत नोंदला जाणारा ४.७ टक्के हा विकास दरही चालू आर्थिक वर्षांत ५.४ ते ५.९ टक्क्य़ांपर्यंत पोहोचण्याची आशा सरकारसह उद्योग क्षेत्राला आहे. विकासदराचे अपेक्षित उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अर्थव्यवस्थेला चालना म्हणून रिझव्‍‌र्ह बँकेने यंदा तरी व्याजदर कपात करावी, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

Story img Loader