रिलायन्स इंडस्ट्रीच्या ४४व्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये दरवर्षीप्रमाणे नवीन घोषणा करण्यात आल्या. सर्वात स्वस्त JioPhone Next, स्वच्छ उर्जा निर्मिती प्रकल्पामध्ये तब्बल ७५ हजार कोटींची गुंतवणूक, पुढील २ वर्षांत १० लाख रोजगार निर्मिती, ५ जी सेवा अशा अनेक घोषणांचा त्यात समावेश होता. मात्र, या घोषणा रिलायन्सच्या गुंतवणूकदारांचं समाधान काही करू शकल्या नाहीत. गुंतवणूकदारांमध्ये उत्साह आणि विश्वास निर्माण करण्यामध्ये या घोषणा कमी पडल्या आणि AGM च्या २४ तासांच्या आत रिलायन्स इंडस्ट्रीजच्या बाजारमूल्यामध्ये तब्बल १.३ लाख कोटी रुपयांची घट झाली आहे. त्यामुळे आता गुंतवणूकदारांमध्ये विश्वास निर्माण करण्याचं आव्हान रिलायन्स इंडस्ट्रीज आणि मुकेश अंबानी यांच्यासमोर असेल.

काय आहेत नव्या घोषणा?

गुरुवारी रिलायन्स उद्योग समूहाच्या ४४व्या एजीएममध्ये मुकेश अंबानी यांनी देशात ५ जी सेवा सुरू करण्यासाठी रिलायन्स तयार असल्याची घोषणा केली. त्यासोबतच, १० सप्टेंबर म्हणजेच गणेश चतुर्थीच्या दिवशी जगातला सर्वात स्वस्त स्मार्टफोन JioPhone Next लाँच करणार असल्याची देखील घोषणा त्यांनी केली. पुढील दोन वर्षांत भारतात १० लाख रोजगार निर्माण करण्याचं लक्ष्य असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. तसेच, देशातली Clean Energy क्षेत्रामध्ये तब्बल ७५ हजार कोटींची गुंतवणूक करणार असल्याचं मुकेश अंबानी यांनी जाहीर केलं. याशिवाय, सौदी अरेबियातील अरामको कंपनीसोबतचा रिलायन्सच्या तेल व्यवसायातील २० टक्के भागीदारी विक्रीचा करार देखील या वर्षाखेरपर्यंत पूर्ण होणार असल्याचं त्यांनी नमूद केलं.

JioPhone Next – मुकेश अंबानींनी केली सर्वात स्वस्त स्मार्टफोनची घोषणा! गणेश चतुर्थीला होणार लाँच!

शेअर्समध्ये २.८ टक्क्यांची घट

मात्र, या सर्व घोषणांनंतर अपेक्षित असलेली वाढ व होता उलट्या दिशेनं घट झाली. शुक्रवारी रिलायन्सच्या शेअर्सनी गेल्या महिन्याभरातील नीचांकी मूल्याची नोंद केली. त्यांचे शेअर्स २.८ टक्क्यांनी घट नोंदवत २ हजार ९३ रुपये २० पैशांवर स्थिरावले. दरम्यान, “अपेक्षेप्रमाणे स्मार्टफोनची घोषणा झाली. अरामको संचालकांचा रिलायन्स बोर्ड ऑफ डिरेक्टर्समध्ये समावेश देखील झाला. मात्र, तेल व्यवसायामधील करार अजूनही पूर्ण झालेला नाही. शिवाय व्हॉट्सअॅप जिओ मार्ट, जीओ आयपीओ अशा गोष्टींची फक्त घोषणा झाली असून त्या नेमक्या कधी अस्तित्वात येतील, याविषयी निश्चित कालावधीची घोषणा करण्यात आली नाही”, असं जे.पी. मॉर्गनकडून आपल्या गुंतवणूकदारांना सूचित करण्यात आलं आहे.

44th Reliance AGM : 5G नेटवर्क सुरू करण्यासंदर्भात ‘रिलायन्स जिओ’ची मोठी घोषणा!

६ आठवड्यांत १७ टक्क्यांची वाढ

दरम्यान, गेल्या ६ आठवड्यांमध्ये रिलायन्सच्या शेअर्सची किंमत जवळपास १७ टक्क्यांनी वाढली आहे. त्यामुळे, यामध्ये थोडेफार बदल झाल्यास फारसं आश्चर्य वाटणार नसल्याचं मत बाजार विश्लेषकांनी मांडलं आहे. या पार्श्वभूमीवर येत्या काही दिवसांमध्ये रिलायन्सच्या बाजारमूल्यामध्ये नेमके कोणत्या दिशेने बदल होतात, हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Story img Loader