कॅनडाच्या सरकारी कंपनीची निम्मी मालकी
विमा, म्युच्युअल फंड व्यवसायातील हिस्सा विक्रीचा सपाटा लावणाऱ्या अनिल अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्सने तिच्या ऊर्जा क्षेत्रातील निम्मा व्यवसाय कॅनडातील सार्वजनिक कंपनीला विकला आहे. या व्यवहारातील रकमेचा उलगडा अद्याप करण्यात आला नाही.
रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरच्या छताखाली मुंबईत वीज पुरवठा करणारी आघाडीची कंपनी म्हणून ओळखले जाणाऱ्या रिलायन्स ऊर्जामधील ४९ टक्के हिस्सा कॅनडाच्या निवृत्ती गुंतवणूक मंडळाला (पीएसपी इन्व्हेस्टमेंट्स) विकण्याची घोषणा सोमवारी येथे करण्यात आली.
रिलायन्स – अनिल धीरुभाई अंबानी समूहातील (एडीएजी) विविध कंपन्यांवरील कर्जाचा भार हलका करण्यासाठी मुख्य प्रवर्तक व अध्यक्ष अनिल अंबानी हे उपकंपनीतील हिस्सा विक्रीसाठी गेल्या काही महिन्यांपासून आग्रही आहे. याचाच एक भाग म्हणून वित्त क्षेत्रातील तिच्या म्युच्युअल फंड व विमा कंपन्यांमधील भागीदार निप्पॉनला हिस्सा वाढू देण्यास समूहाने गेल्याच महिन्यात संमती दिली.
रिलायन्स इन्ऱ्फ्रास्ट्रक्चरमधील रिलायन्स पॉवरचा जवळपास निम्मा हिस्सा विकून स्वतंत्र उपकंपनी स्थापन करण्यात आली असून त्यात मुळची रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर ही ५१ टक्के भागीदारी राखेल. रिलायन्स पॉवरमार्फत मुंबईच्या ४२० चौरस मीटर भागात विद्युत पुरवठा केला जातो.
कंपनीचे निवासी, वाणिज्यिक असे ३० लाख ग्राहक आहेत. १,८०० मेगा व्ॉटपर्यंत विद्युत वितरण करणाऱ्या या व्यवसायामार्फत कंपनीला गेल्या आर्थिक वर्षांत ७,७०० कोटी रुपयांचा महसूल मिळाला होता. तर पीएसपी एन्व्हेस्टमेंट ही कॅनडातील सार्वजनिक निवृत्ती गुंतवणूक कंपनी असून तिच्या अंतर्गत ११२ अब्ज डॉलरच्या मालमत्तेचे व्यवस्थापन हाताळले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा