रोमिंग दरम्यानचे कॉल तसेच एसएमएस दर आणखी कमी करण्याच्या विचारात दूरसंचार नियामक प्राधिकरण असून याबाबत दूरसंचार सेवा पुरवठादार कंपन्यांचे मत जाणून घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर नव्याने होणाऱ्या ध्वनिलहरी लिलव परवान्यांचे शुल्कही कमी होण्याची शक्यता आहे.
केंद्र सरकारच्या ‘एक राष्ट्र, मोफत रोमिंग’ धोरणांतर्गत प्राथमिक टप्प्यावर रोमिंग इनकमिंग, आऊटगोईंग कॉल दर तसेच एसएमएस दर कमी करण्याच्या विचारात प्राधिकरण आहे. सध्या एक रुपया ते दीड रुपयापर्यंत असणारे हे दर एक रुपयांपेक्षाही कमी असावे, असा प्राधिकरणाचा आग्रह आहे. मात्र याबाबत संबंधित दूरसंचार सेवा पुरवठादारांशी चर्चा करण्याची आवश्यकता मांडण्यात आली आहे.
दरम्यान, टुजी स्पेक्ट्रम (जीएसएम) लिलावासाठी काल शेवटचा दिवस असताना आलेल्या केवळ एकाच कंपनीच्या बोलीमुळे एकूणच लिलाव शुल्काचा नव्याने विचार करण्याची आवश्यकताही मांडली जात आहे. तर सीडीएमएसाठीच्या परवान्यांच्या लिलावाची प्रक्रिया येत्या ११ मार्चपासून सुरू होणार आहे.