मुंबई : उत्तरोत्तर सशक्त होत असलेल्या अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या विनिमय मूल्यातील विक्रमी पडझड सुरूच असून, शुक्रवारच्या सत्रात आणखी १५ पैशांच्या घसरणीने तो ८२.३२ पातळीवर स्थिरावला. ही रुपयाची ऐतिहासिक नीचांकी पातळी आहे. गुरुवारच्या एका सत्रात डॉलरच्या तुलनेत रुपयात ५५ पैशांची घसरण झाली आणि प्रथमच रुपयाने ८२ ची पातळी ओलांडत ८२.१७ हा सार्वकालिक नीचांकी बंद स्तर नोंदविला होता.
जागतिक मंदीच्या भीतीने गुंतवणूकदारांनी सुरक्षित गुंतवणुकीचे साधन म्हणून डॉलरला मागणी वाढली आहे. त्याचप्रमाणे तेल निर्यातदारांच्या ‘ओपेक प्लस’ राष्ट्रगटाने नोव्हेंबरपासून खनिज तेलाच्या उत्पादनात मोठय़ा कपातीची घोषणा केल्याने, आंतरराष्ट्रीय स्तरावर खनिज तेलाच्या किमती तापत चालल्या आहेत. तेल आयातदारांकडून डॉलरला मागणी वाढल्याने रुपयाच्या घसरणीला आणखीच तीव्र बनविले गेले आहे. परकीय चलन मंचावर शुक्रवारच्या सत्रात रुपयाने ८२.१९ पातळीवरून व्यवहाराला सुरुवात केली. सत्रादरम्यान ८२.४३ रुपयांपर्यंत चलन खालावले आणि दिवसअखेर ८२.३२ या ऐतिहासिक नीचांकी पातळीवर जाऊन ते स्थिरावले.