यापूर्वी १५ बँकांचे विलीनीकरण करून घेणाऱ्या कॉसमॉस बँकेने आर्थिक अडचणीत असलेल्या रुपी बँकेचे पुनरुज्जीवन करण्याची जबाबदारी घ्यावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी केले. रुपी बँकेच्या पुनरुज्जीवनासाठी केंद्रीय अर्थमंत्रालय आणि रिझव्र्ह बँकेबरोबर चर्चा करून तांत्रिक अडचणी सोडविण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी सहकार्य करेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
कॉसमॉस को-ऑप. बँकेच्या गणेशखिंड रस्त्यावर उभारण्यात आलेल्या ‘कॉसमॉस टॉवर’ या अत्याधुनिक कापरेरेट वास्तूचे उद्घाटन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. महापौर दत्ता धनकवडे, सामाजिक न्यायराज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार अनिल शिरोळे, संजय काकडे, बँकेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, उपाध्यक्ष मिलिंद काळे, मानद अध्यक्ष मुकुंद अभ्यंकर आणि व्यवस्थापकीय संचालक विक्रांत पोंक्षे या वेळी उपस्थित होते.
सहकारी बँकांनी कालानुरूप बदल करण्याची आवश्यकता आहे, असे सांगून देवेंद्र फडणवीस म्हणाले, सहकार हा संस्कार आहे. त्यामुळे सहकारी संस्थांमध्ये काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी आपण संस्थेचे विश्वस्त आहोत या भावनेने काम केले पाहिजे. २१ व्या शतकातील स्पर्धेमध्ये टिकण्यासाठी सहकारी बँकांनी गुणवत्ता आणि उत्पादकता याला प्राधान्य दिले पाहिजे. सध्या ६० टक्के बँका या केवळ तीन जिल्ह्य़ांतच आहेत. बँका आणि सोसायटय़ांकडून कर्जपुरवठा न झाल्यामुळे ५५ टक्के शेतक ऱ्यांना खासगी सावकाराकडून कर्ज घ्यावे लागले. त्याची वेळेमध्ये परतफेड करता आले नसल्यामुळे शेतकरी आत्महत्या घडल्याचे अहवालामध्ये नमूद करण्यात आले आहे. प्रगत अर्थव्यवस्थेमध्ये अर्थपुरवठा आणि सेवेला महत्त्व आहे. तळागाळातील लोकांपर्यंत कर्जपुरवठा करण्यासाठी बँकांचा विस्तार होण्याची आवश्यकता आहे.
कॉसमॉस बँकेने देखणे कापरेरेट कार्यालय सुरू करून पुण्याच्या वैभवामध्ये भर घातली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जन-धन योजना राबवून देशभरात पाच कोटी लोकांची बँक खाती उघडून त्यांना अर्थव्यवस्थेमध्ये सामावून घेतले आहे. त्यामुळे अनुदानाचे पैसे खातेदारांच्या नावे बँकांमध्ये जमा होणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
बँकेच्या सात राज्यांमध्ये १२५ शाखा असून २० लाख ग्राहक आहेत. रिझव्र्ह बँकेने ‘करन्सी चेस्ट’ ही सुविधा बँकेला उपलब्ध करून दिली असल्याची माहिती कृष्णकुमार गोयल यांनी प्रास्ताविकात दिली. मुकुंद अभ्यंकर यांनी मनोगत व्यक्त केले. सुधीर गाडगीळ यांनी सूत्रसंचालन केले. मििलद काळे यांनी आभार मानले.
संग्रहित लेख, दिनांक 26th Nov 2014 रोजी प्रकाशित
अडचणीतील रुपी बँकेची जबाबदारी ‘कॉसमॉस’ने घ्यावी
यापूर्वी १५ बँकांचे विलीनीकरण करून घेणाऱ्या कॉसमॉस बँकेने आर्थिक अडचणीत असलेल्या रुपी बँकेचे पुनरुज्जीवन करण्याची जबाबदारी घ्यावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी केले.
First published on: 26-11-2014 at 01:06 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rupee bank responsibility should take by cosmos co operative bank