डॉलरच्या तुलनेत रुपया मंगळवारीही घसरणीत असताना त्याने दिवसभरात ५५ चा तळ गाठून धडकी भरविली. दिवसअखेर मात्र स्थानिक चलन काहीसे सुधारून ५४.४३ वर स्थिरावले. तेल आयातदारांकडून अमेरिकन डॉलरची मागणी वाढल्याने त्याच्या खरेदीचे प्रमाणही गेल्या काही दिवसांपासून वधारू लागले आहे. त्यामुळे रुपया कमकुवत होत आहे.
रुपयाने कालच्या सत्रात २०१२ मधील सर्वात मोठी दुसरी घसरण नोंदविली होती. यामुळे तो ५४ च्याही खाली गेला होता. दुपारच्या सत्रापूर्वीच रुपया ५५ च्या तळात गेला. परिणामी रुपया ५५ च्या नजीक येताना त्याच्या गेल्या दोन महिन्याच्या नीचांकावर आला होता. दिवसअखेर तो ५५ च्या खाली गेला नसला तरी अद्यापही ५४ च्या खालीच आहे.
रुपयाने सर्वात खालचा स्तर जून २०१२ मध्ये गाठला होता. २७ जून रोजी व्यवहारात ५७.३० पर्यंत खाली गेलेला रुपया २२ जून रोजी सत्राअखेर ५७.१५ या ऐतिहासिक नीचांक पातळीपर्यंत आला होता.
डिसेंबपर्यंत रुपया ५१ पर्यंत!
येत्या डिसेंबपर्यंत रुपया पुन्हा एकदा ५१ च्या वर गेलेला असेल, असा आशावाद बँक ऑफ अमेरिका मेरिल लिंचने व्यक्त केला आहे. भारतीय चलनाच्या या बळकटीला देशातील राखीव विदेशी चलन जबाबदार ठरेल; आणि जोपर्यंत या देशातील मध्यवर्ती बँक हस्तक्षेप करीत नाही तोपर्यंत स्थानिक चलन ५० च्या पल्ल्याड जाणार नाही, असा दावाही अमेरिकन बँकेने केला आहे. सप्टेंबर २०११ पासून रुपयाचे १८.५ टक्के अवमूल्यन झाले आहे. ब्राझीलनंतर भारताचे प्रमाण सर्वाधिक आहे.