सलग पाचव्या दिवशी घसरणारा रुपया सोमवारी अमेरिकी डॉलरच्या तुलनेत ५६ चा तळ गाठता झाला. आठवडय़ाच्या पहिल्याच दिवशी विदेशी चलन व्यवहारात रुपया २२ पैशांनी घसरत ५५.७३ पर्यंत खाली गेला. ५५.४५ च्या पातळीवर चलन व्यवहार सुरू झाले आणि रुपया दिवसभरात ५५.८९ पर्यंत घसरला. तेल आयातदार आणि बँकांकडून अमेरिकन डॉलरच्या सततच्या वाढत्या मागणीमुळे स्थानिक चलन अधिक अशक्त बनत चालले आहे. घसरत्या रुपयाबद्दल रिझव्र्ह बँकेच्या हस्तक्षेपाची अपेक्षा वाढत आहे.
गेल्या आठवडय़ाच्या सुरुवातीला ५५.१० सह ५५ च्या काठावर असणारा रुपया आता ५६ च्या नजीक पोहोचला आहे. पाच दिवसांच्या सत्रात त्यात ६३ पैशांची घसरण झाली आहे. या कालावधीत शुक्रवारची त्यातील घसरण मोठी, ३० पैशांची होती. ‘इंडिया फॉरेक्स अॅडव्हाजर’चे संस्थापक अभिषेक गोएंका यांनी, युरोच्या उभारीची चिंता रुपयाच्या घसरणीची चिंता वाढवित असल्याचे म्हटले आहे.दरम्यान थेट विदेशी गुंतवणूक मर्यादावाढीच्या राजकीय पटलावरच्या अस्थिरतेतही भांडवली बाजारातील गुंतवणूकदारांनी समभाग खरेदीचे सत्र आठवडय़ाच्या सुरुवातीलाही कायम ठेवल्याने ‘सेन्सेक्स’ ३० अंशांनी वधारून १८,५०० च्या पार गेला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा ‘निफ्टी’ ९.३० अंश वाढीमुळे ५,६३५.९० पर्यंत पोहोचला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा