अर्थव्यवस्थेला गतिमानता देण्यासाठी रुपयाच्या अवमूल्यनाचा उपाय योजण्याचा पर्याय कदापिही स्वीकारला जाणार नाही, अशी स्पष्टोक्ती रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी सोमवारी येथे बोलताना केली.
भारतीय उद्योग महासंघ (सीआयआय) कडून आयोजित एमएसएमई परिषदेच्या उद्घाटकीय भाषणांत रघुराम राजन यांनी रुपयाच्या विनिमय मूल्याची पातळी काय असावी, ती आणखी खाली अथवा वर नेता येईल काय, अशा प्रश्नांत रिझव्‍‌र्ह बँकेची कोणतीही भूमिका व हस्तक्षेप नसावा आणि नसेल, या आपल्या भूमिकेचा त्यांनी येथे पुनरुच्चार केला.
चीन, जपान आणि कोरिया या देशांची उदाहरणे प्रस्तुत करून, त्यांनी त्यांच्या चलनाचे विनिमय मूल्य खाली आणून उद्योगक्षेत्र आणि निर्यात वाढीस कसा लाभ पोहचविला असे सांगितले जाते. त्यामुळे आपणही असे चलनाचे अवमूल्यन करून त्याद्वारे विकास साधावा अशीही मागणी होत आहे, याकडे राजन यांनी लक्ष वेधले. तथापि ‘माझा व्यक्तिश: या धोरणांवर विश्वास नाही आणि दीर्घावधीत इच्छित परिणामांच्या दृष्टीने हा उपाय व्यवहार्यही नाही. यातून अनेक समस्या पुढे जाऊन उभ्या राहतात,’ असे ते म्हणाले.

Story img Loader