नवी दिल्ली :डॉलरच्या तुलनेत गेल्या काही महिन्यांपासून रुपयात मोठी घसरण सुरू आहे. मात्र रुपयातील घसरण माहिती तंत्रज्ञान, रसायने आणि धातू क्षेत्रातील कंपन्यांच्या पथ्यावर पडण्याची शक्यता आहे, असे पतमानांकन संस्था एस अँड पी ग्लोबलने म्हटले आहे.
एस अँड पी ग्लोबलने शिफारस केलेल्या बहुतांश कंपन्यांना परदेशातून मोठय़ा प्रमाणावर महसूल प्राप्त होतो. घसरत्या रुपयामुळे बहुतांश कंपन्यांच्या कमाईमध्ये मोठय़ा प्रमाणावर वाढ झाली आहे. शिफारसपात्र ५० टक्क्यांहून अधिक कंपन्यांच्या परिचालन नफ्यात म्हणजेच व्याज, घसारा आणि करांपूर्वी कंपनीने मिळविलेल्या नफ्यात वाढ झाली आहे. देशांतर्गत पातळीवर दूरसंचार क्षेत्रातील कंपन्या मूल्य वध-घटीची जोखीम नियंत्रित करण्याच्या अर्थात हेजिंग धोरणांमुळे रुपयाच्या घसरणीला तोंड देण्यासाठी समर्थ आहेत. भारती एअरटेलने पुढील १२ महिन्यांसाठी कंपनीवरील थकीत कर्जाची परतफेड करण्यासाठी डॉलर-रुपया चलन अदलाबदल (करन्सी स्वॅप) योजनेचा अवलंब करून, रुपयाच्या मूल्य घसरणीपासून बचावाचा मार्ग स्वीकारला आहे. विप्रो, इन्फोसिस आणि एचसीएल टेक्नॉलॉजीज या माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्या सेवा निर्यात करतात आणि त्या माध्यमातून डॉलरमध्ये मोठा महसूल मिळवतात. डॉलरच्या मजबुतीमुळे तो आणखीच वाढला आहे. वेदान्त रिसोर्सेससारख्या धातू कंपन्यांच्या नफ्यात देखील वाढ होत आहे. डॉलरच्या तुलनेत भारतीय चलनातील एक रुपयांच्या घसरणीने कंपनीचा वार्षिक ढोबळ नफा ५ कोटी डॉलरने वाढेल, असा दावा तिने केला आहे.