बुधवारच्या चलन बाजारातील व्यवहारात डॉलरच्या तुलनेत ६४ पर्यंत जाणाऱ्या रुपया दिवसअखेर काहीसा सावरला तरी सलग तिसऱ्या व्यवहारात त्यावर घसरणीचा दबाव कायम दिसला. स्थानिक चलन मंगळवारच्या तुलनेत ८ पैशांनी रोडावत ६३.६१ पर्यंत घसरले.
भारतीय चलन रुपयाने गेल्या सलग तीन व्यवहारांत १३२ पैशांची (२.१२%) घसरण नोंदविली आहे. चलनाचा व्यवहार बुधवारी ६३.८० अशा तळातून सुरू झाला व तो ६३.८९ पर्यंत घसरला. सत्रादरम्यान ६३.४९ पर्यंत सावरल्यानंतर दिवसअखेर मात्र त्यात घसरणच नोंदली गेली. भांडवली बाजारातून निधी काढून घेण्यासाठी विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांना आवश्यकता भासणाऱ्या अमेरिकी डॉलरमुळे रुपयावरील दबाव कायम राहिला आहे. २०१४ मधील सर्वात मोठी आपटी नोंदविणाऱ्या भांडवली बाजारात या गुंतवणूकदारांनी डॉलरमधील गेल्या काही दिवसांत सुमारे ३,६०० कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेतली आहे.
अमेरिकी मध्यवर्ती बँक- फेडरल रिझव्र्हच्या बुधवारी उशिरा संपणाऱ्या बैठकीतील निर्णयांकडेही चलन बाजाराचे लक्ष आहे. अमेरिकी डॉलरने प्राप्त केलेल्या सशक्तततेने सर्वच आशिया ई तसेच उदयोन्मुख अर्थव्यवस्थांचे चलन त्यातुलनेत कमालीचे कमकुवत बनलेले दिसून आले आहे. अनेक देशांच्या चलनांमध्येही मोठे अवमूल्यन सुरू आहे.
सोने-चांदी दरात मोठा उतार
मुंबईतील सराफा बाजारात बुधवारी मौल्यवान धातूंच्या दरांमध्ये मोठी घसरण नोंदली गेली. मंगळवारी संमिश्र हालचाल नोंदविल्यानंतर बुधवारअखेर सोन्याचे तोळ्याचे दर बुधवारी १४० रुपयांनी खाली आले. १० ग्रॅमच्या सोन्याला २७ हजारानजीकचा, २६,९४५ रुपयांचा भाव मिळाला. तर चांदीदेखील आता किलोमागे ३७ हजार रुपयांपर्यंत पोहोचली आहे. पांढऱ्या धातूचे दर बुधवारी किलोसाठी एकदम ८५० रुपयांनी कमी झाले.