गेल्या तीन महिन्यांपासून ढासळत असलेल्या रुपयामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर दुधाची भुकटी महाग होत असून त्याचा परिणाम भारतातील दूध तसेच दुग्धजन्य उत्पादनांच्या किंमतवाढीवर होत आहे. रमजानपासून सुरू झालेल्या सणांच्या हंगामाच्या निमित्ताने दुधाचा वाढता वापर पाहता, पुरवठा नियमित राखण्यासाठी येत्या दिवाळीपर्यंत दुधाच्या दरवाढीचे सत्र कायम राहण्याचे संकेत आहेत.
एका डॉलरसाठी ६५ रुपयांपुढे किंमत मोजणे क्रमप्राप्त ठरलेल्या सध्याच्या प्रतिकूल परिस्थितीचा फटका आंतरराष्ट्रीय स्तरावरून खरेदी होणाऱ्या दुधाची भुकटी आदी कच्च्या मालाला बसला आहे. रुपयाच्या तुलनेत तीन महिन्यात सुमारे २० टक्क्यांनीवधारलेल्या डॉलरमुळे दुधाच्या भुकटीचा आंतरराष्ट्रीय भावदेखील किलोसाठी २१५ ते २२५ रुपयांवर गेला आहे. काही दिवसांपूर्वी हे दर १७० ते १८० रुपये प्रतिकिलो होते. भारतात गेल्या काही वर्षांपासून दुधाची मागणी व प्रत्यक्ष पुरवठा यातील तफावत कमालीची वाढली आहे आणि दुधाची नव्हे तर दूध-भुकटीच्या आयातीतून ही तूट भागविली जाते. भुकटीच्या महागाईचे सावट दुधाचे दर वाढण्यावर पडले आहे. अनेक ब्रॅण्डेड कंपन्यांचे पॅकेज्ड दूध महाग आहेच, सहकारी दूधसंघाच्या दुधालाही लिटरमागे २ ते ३ रुपये जास्तीचे मोजावे लागत आहेत. हेच चित्र पुढेही कायम राहण्याची शक्यता असून लिटरमागे पाच रुपयांपर्यंत वाढीची शक्यताही वर्तविली जात आहे.
नजीकच्या काळात दुधाचे दर १२ ते १५ टक्के वाढतील, अशी भीती पराग मिल्क फूड्सचे अध्यक्ष देवेंद्र शहा यांनी व्यक्त केली. कंपनीच्या गोवर्धन ब्रॅण्डअंतर्गत दूध तसेच अन्य दुग्धजन्य पदार्थाची विक्री होते. दूध व्यवसायावरील हे संकट दूर सारण्यासाठी सरकारी उपाययोजनांचा आग्रह शहा यांनी धरला आहे. उत्पादकांद्वारे शेतकऱ्यांना अधिक रक्कम मोजण्यासह वाहतूक आदी खर्चातही त्यामुळे भर पडत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. देशांतर्गत दूध-उत्पादनांतही वाहतूक हा घटक मोठा असून, इंधनदरवाढीबाबत ताजे संकेत दूध-महागाईच्या शक्यतेला आणखीच अधोरेखित करतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा