सुब्रतो रॉय यांच्या सुटकेसाठी १०,००० कोटी रुपये जमा करणार असाल तर सहारा समूहाची गोठविण्यात आलेली बँक खाती खुली करण्यास आपण तयार आहोत, असे सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी झालेल्या सुनावणीत पुन्हा एकवार स्पष्ट केले. परिणामी रॉय यांची मुक्तता आणखी लांबणीवर पडली आहे.
गेल्या दीड महिन्यांपासून नवी दिल्लीच्या तिहार तुरुंगात असलेल्या रॉय यांना जामिन बहाल केला जाण्यासंदर्भातील सुनावणी बुधवारी सर्वोच्च न्यायालयात झाली. त्या वेळी सहाराचे वकील सी. ए. सुंदरम आणि राम जेठमलानी यांनी बँक खाती खुली केल्याशिवाय जामिनाची रक्कम देता येणार नाही, असे सांगितले.
रॉय यांना जामीन हवा असल्यास १० हजार कोटी रुपये भरण्याचे आदेश यापूर्वीच देण्यात आले आहेत. ही रक्कम भरण्यास समूहाच्या वकिलांनी असमर्थताच व्यक्त केली आहे. केवळ २,५०० कोटी रुपयेच भरू शकतो, असे सांगण्यात आले होते. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयातील बुधवारच्या सुनावणीपूर्वी सहारा समूहाने सेबीची माफी मागितली आहे. भांडवली बाजार नियामकाविरुद्ध प्रसारमाध्यमातून जाहिरातीद्वारे कडवी भूमिका घेण्याबाबत ही माफी समूहाने मागितली आहे.

Story img Loader