जामीनापोटी भरावयाच्या रकमेकरिता मालमत्ता विक्री बोलणीसाठी सहाराचे अध्यक्ष सुब्रता रॉय यांना दहा दिवसांच्या कालावधीची मुभा देण्यात आली आहे. यासाठी नवी दिल्लीच्या तिहार तुरुंग परिसरातच अद्ययावत परिषद कक्ष उपलब्ध करून देण्यात आला आहे. मंगळवार, ५ ऑगस्टपासून कार्यालयीन कामकाजाचे दहा दिवस सकाळी ६ ते रात्री ८ दरम्यान रॉय हे त्यांची मालमत्ता विक्रीसाठी भागीदारांशी चर्चा करू शकतील. यावेळी त्यांच्याबरोबर न्यायालयातील दोन वरिष्ठ अधिकारी उपस्थित असतील. त्याचबरोबर मोबाईल, लॅपटॉप, प्रिन्टर यासह तीन जणांना या कक्षात प्रवेशास परवानगी देण्यात आली आहे.
रॉय तसेच सहाराविरुद्ध सेबीने कारवाई करत हे प्रकरण थेट सर्वोच्च न्यायालयात नेले होते.
गुंतवणूकदारांच्या फसवणूकप्रकरणी गेल्या पाच महिन्यांपासून तुरुंगाआड असलेल्या ६५ वर्षीय रॉय यांनी न्यायालयात जामीनापोटी जमा करावयाच्या १० हजार कोटी रुपयांच्या उभारणीसाठी सहाराच्या विदेशातील मालमत्ता विकण्याची परवानगी देण्यात आली आहे. यासाठी रॉय यांनी यापूर्वी आपल्याला नजरकैदेत ठेवण्याची मागणीही केली होती. यासाठी आईच्या आजाराचे कारण देणाऱ्या रॉय यांची मागणी धुडकावत न्यायालयाने तुरुंगात मालमत्ता विक्रीविषयीच्या बोलणीची तयारी करून दिली आहे.

Story img Loader