सहाराश्रींच्या सुटकेसाठी १० हजार कोटी रुपये न्यायालयात देण्यास असमर्थ ठरलेल्या सहारा समूहाने आता कर्मचाऱ्यांकडून निधी गोळा करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. गेल्या २० दिवसांपासून तुरुंगात खितपत पडलेल्या सुब्रतो रॉय यांना जामीन मिळण्यासाठी प्रत्येक कर्मचाऱ्याने किमान एक लाख रुपये द्यावे, असे आवाहन पत्र समूहाने शुक्रवारी जारी केले.
सर्वोच्च न्यायालयात जामीन मिळविण्यात अपयश आलेल्या सहाराचे प्रमुख सुब्रतो रॉय यांचा ३ एप्रिलपर्यंत तुरुंगातील मुक्काम कायम राहिला आहे. रॉय यांना सुटका हवी असेल तर १० हजार कोटी रुपये भरावे, असा आदेश न्यायालयाने गुरुवारी दिला होता. त्यानंतर सहाराश्रींसाठी किमान एक लाख रुपये गोळा करण्याचे आवाहन करणारे पत्र समूहातील कर्मचाऱ्यांच्या हातात पडले. रॉय यांच्यासाठी किमान ५,००० कोटी रुपये तरी यामार्फत उभे राहावे, असे आर्जव कर्मचाऱ्यांसह समूहाच्या शुभेच्छुकांना या पत्रात करण्यात आले आहे.
मनोरंजन, बांधकाम, माध्यम, रिटेल आदी क्षेत्रांत असणाऱ्या सहारा समूहात ११ लाखांहून अधिक कर्मचारी आहेत. त्यांना लिहिलेल्या एक पानी पत्रात सहारा इंडिया परिवारातील प्रत्येक सदस्याने किमान एक ते तीन लाख रुपये वा अधिक रक्कम देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.  
तथापि खुद्द रॉय यांनी अथवा कोणत्याही संचालकाने असे पत्र लिहून पैशाचे आवाहन केले नसल्याचे सहारा समूहाने स्पष्ट केले आहे. उलट काही ‘भावनिक लोकांनीच’ हा पुढाकार घेतला असण्याची शक्यता समूहाने व्यक्त केली आहे.

Story img Loader