तुरुंगातून बाहेर पडण्यासाठी मोजावयाच्या १० हजार कोटी रुपयांच्या तरतुदीत झटलेल्या सहाराचे प्रमुख सुब्रतो रॉय यांना या व्यवहारासाठी अधिक वेळ हवा आहे. विदेशातील मालमत्ता विक्रीसाठी इच्छुक भागधारकांशी बोलणी करण्याची न्यायालयाने दिलेली मुदत येत्या २० ऑगस्ट रोजी संपत असताना ती अधिक वाढवून देण्याची मागणी केली जाणार आहे. याबाबत सहाराचे वकील केशव मोहन यांनी ‘रॉयटर’ला सांगितले की, सहाराप्रमुख आणखी १५ दिवसांचा अवधी सर्वोच्च न्यायालयाकडून मागून घेतील. त्याचबरोबर तुरुंगात यासाठी रॉय यांना मिळणारी अत्याधुनिक सुविधाही या दरम्यान कायम ठेवावी, अशी विनंतीही केली जाणार आहे. या वृत्तसंस्थेला सहारामार्फत मात्र कोणताही दुजोरा देण्यात आला नाही. गुंतवणूकदारांचे पैसे परस्पर अन्य योजनांमध्ये वळते केल्याप्रकरणी सहाराचे प्रमुख सुब्रतो रॉय हे मार्चपासून नवी दिल्लीच्या तिहार तुरुंगात आहेत. जामिनासाठी १० हजार कोटी उभे करण्याकरिता रॉय यांनी विदेशातील आपली मालमत्ता विक्रीची परवानगी न्यायालयाकडे मागितली.

Story img Loader