भारताच्या दुचाकी बाजारपेठेवरील विदेशी बनावटीच्या कंपन्यांची पकड पक्की होत चालली आहे. गेल्या अनेक दशकांपासून येथे पाव रोवून असलेल्या आणि महिन्याला अनेक लाखांची मोटरसायकल विक्री करणाऱ्या हीरो, बजाज, टीव्हीएससारख्या कंपन्यांना सध्याच्या बाजारपेठेत नवनव्या ब्रॅण्डसह तगडय़ा स्पर्धेत उतरलेल्या जपानच्या कंपन्यांनी विशेषत: मोटरसायकल विक्रीत नामोहरम केले आहे.
दसऱ्यापाठोपाठ दिवाळीच्या मोसमात जपानी बनावटीच्या होंडा, सुझुकी आणि इंडिया यामाहा या कंपन्यांनी दुचाकी वाहन विक्रीत लक्षणीय वाढ नोंदविली आहे. देशातील प्रमुख अर्धा डझन दुचाकी वाहन निर्मिती कंपन्यांपैकी या अध्र्या कंपन्यांनी दुहेरी आकडय़ातील विक्री यंदाच्या नोव्हेंबरमध्ये गाठली आहे. तुलनेत हीरो मोटोकॉर्प, बजाज ऑटो आणि टीव्हीएस या भारतीय दुचाकी कंपन्यांनी नोव्हेंबरमध्ये एकेरी आकडय़ासह वाहन विक्रीतील घट राखली आहे.
मोटरसायकलसह एकूण भारतीय दुचाकी विक्रीतील हीरोचे क्रमांक एकचे पद काहीसे अस्थिर झाले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून कंपनी या स्थानावर कायम आहे. हीरो मोटोकॉर्पने यंदाही ५ लाखावरील वाहन विक्रीचा क्रम कायम राखला आहे; मात्र वार्षिक तुलनेत नोव्हेंबर २०१२ मध्ये ६.४२ टक्क्यांची घसरण नोंदली गेली आहे.
कंपनीची सर्वाधिक विकले जाणाऱ्या स्प्लेन्डरला डिस्कव्हरच्या रुपाने मात करणाऱ्या बजाज ऑटोच्या वाहन विक्रीतही यंदा दीड टक्क्यांहून अधिक घट झाली आहे. बजाज ऑटोच्या मोटरसायकलसह एकूण निर्यातीतही यंदा घसरण झाली आहे. कंपनीची एकूण विक्री सव्वा तीन लाखाच्या घरात आहे.
हीरोला आता तिचीची पूर्वीची भागीदार होन्डा आणि सुझुकी कट्टर स्पर्धा देऊ पाहत आहेत. उभय कंपन्यांच्या नोव्हेंबरमधील विक्रीत अनुक्रमे १२.२४ आणि २५ टक्के वाढ झाली आहे. नोव्हेंबरमध्ये होन्डाने २,२३,११६ तर सुझुकीने ३९,१३४ दुचाकी विकल्या आहेत. हीरोला टक्कर देऊ पाहणाऱ्या या दोन्ही कंपन्या मूळच्या जपानच्या आहेत.
दक्षिणेतील टीव्हीएसने मोटरसायकल विक्रीत घट नोंदविली असून तीन चाकी वाहनांना मात्र नोव्हेंबरमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला आहे. कंपनीची मोपेड आणि गिअरलेस स्कूटरची मागणीही यंदा कायम राहिली आहे. कंपनीने २ टक्के घसरणीसह गेल्या महिन्यात पावणे दोन लाखांची वाहन विक्री केली आहे. इंडिया यामाहाने ४४ हजार मोटरसायकलींसह नोव्हेंबरमध्ये १४ टक्के वाहन विक्रीतील वाढ नोंदविली आहे. कंपनीची निर्यात घसरली असली तरी देशांतर्गत विक्री वाढली आहे.
नोव्हेंबरच्या विक्रीचे तौलनिक आकडे
भारतीय कंपन्यावर्षांगणिक
(वाढ/घट)
हीरो मोटोकॉर्प ५,०२,३०५ -६.४२ %
बजाज ऑटो ३,२६,७२७ -१.५७%
टीव्हीएस १,७५,५३५ -२%
जपानी कंपन्या
होंडा २,२३,११६ +१२.२४%
सुझुकी ३९,१३४ +२५%
इंडिया यामाहा ४४,६९१ +१४%