बचत खात्यांशी प्राप्तिकराचा कायम खाते क्रमांक – ‘पॅन’ जोडण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यास बँकांना आता तीन महिन्यांचा कालावधी मिळणार आहे. कर चुकवेगिरी तसेच आर्थिक गैरव्यवहार टाळण्यासाठी बँकांना संबंधित ग्राहकाचा पॅन त्यांच्या बचत खात्याशी संलग्न करणे अनिवार्य ठरणार आहे.

प्राप्तिकर विभागाच्या ‘कलम ११४ बी’नुसार विविध आर्थिक व्यवहारांसाठी पॅन नोंद करणे बंधनकारक केले गेले आहे.

खातेदारांकडे पॅन नसल्यास त्यांना बँकेला फॉर्म-६० भरून द्यावा लागणार आहे. पॅन अथवा अर्ज बँकांमध्ये सादर करण्याची यापूर्वीची मुदत २८ फेब्रुवारी होती. मात्र कर विभागाने ५ एप्रिल रोजी काढलेल्या याबाबतच्या परिपत्रकानुसार ती आता ३० जूनपर्यंत वाढविण्यात आली आहे.

प्राप्तिकर कायद्यानुरूप बँका, टपाल कार्यालयातील बचत खातेदार तसेच सहकारी बँकांना त्यांच्या खातेदारांकडून पॅन किंवा तो नसल्यास फॉर्म ६० ची नोंद करण्याच्या सूचना जानेवारी २०१७ मध्ये देण्यात आल्या होत्या. बँक खाते सुरू करताना ही प्रक्रिया पूर्ण केली नसल्यास त्याबाबतची अद्ययावतता २८ फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करावयाची होती.

निश्चलनीकरणाच्या प्रक्रियेदरम्यान प्राप्तिकर विभागाने बँका तसेच पोस्टातील बचत खात्यात जमा होणाऱ्या सर्व २.५० लाख रुपयांवरील रकमेबाबतची माहिती मागविली होती. तसेच १० नोव्हेंबर ते ३० डिसेंबर २०१६ दरम्यान जमा होणाऱ्या १२.५० लाख रुपयांवरील माहितीही विभागाने बँका, पोस्टाकडून मागितली होती. एकाच दिवसात ५०,००० रुपयांपेक्षा अधिक रकमेची माहितीही देणे बंधनकारक करण्यात आले होते. निश्चलनीकरणा दरम्यान १५ लाख कोटी रुपयांच्या जुन्या ५०० व १००० रुपयांच्या नोटा बँकांमध्ये जमा झाल्या आहेत. संशयास्पद व्यवहारांसाठी यापूर्वी विभागाने खातेदार, ग्राहकांना नोटिसा बजावल्या आहेत.

 

Story img Loader