अल्प मुदतीच्या ठेवींवरील व्याजदरात मंगळवारी भारतीय स्टेट बँकेने अध्र्या टक्क्याने कपात केली आहे. १७९ दिवस अर्थात सहा महिन्यांपेक्षा कमी मुदतीच्या ठेवींसाठी हा निर्णय लागू करण्याची घोषणा बँकेने केली.
महागाई दर कमी होत असताना रिझव्‍‌र्ह बँकेकडून व्याजदराची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. यामुळे गृह आदी कर्जदर कमी होण्यास वाव मिळेल. मात्र बँकेने ठेवींवरील व्याजदर कमी करून एकूणच बँकिंग क्षेत्राला चुचकारले आहे. यामुळे आता अन्य बँकांही त्यांचे ठेवींवरील व्याज कमी करतील.
सोमवापर्यंत ७ ते १७९ दिवसांच्या म्हणजेच एका आठवडय़ापासून ते सहा महिन्यांपर्यंतच्या मुदत ठेवींवर साडे सात टक्के इतका व्याजदर दिला जात होता. मात्र मंगळवारी त्यात कपात करीत तो सात टक्क्यांवर आणण्यात आला. येत्या १८ जुलैपासून नवे व्याजदर लागू करण्यात येईल. एक कोटीहून अधिक रकमेच्या ठेवी असल्यास व्याजदरातील कपात दोन टप्प्यांमध्ये करण्यात येणार आहे.
एक आठवडय़ापासून ते दोन महिन्यांपर्यंतच्या ( ७ ते ६० दिवस) ठेवींवरील व्याजदरात पाव टक्क्याने कपात करण्यात आली असून हे दर ६.२५ टक्के करण्यात आले आहेत. तर ६१ दिवसांपासून १७९ दिवसांपर्यंतच्या ठेवींवरील व्याजदर ६.७५ टक्के करण्यात आले आहेत. चालू वर्षी फेब्रुवारी महिन्यात स्टेट बँकेने आपल्या व्याजदरांची फेररचना केली होती आणि ते दर ०.५ टक्क्याने वाढवले होते.

Story img Loader