डेबिट अथवा क्रेडिट कार्ड प्रत्यक्ष यंत्रामध्ये न टाकताही आर्थिक व्यवहार त्वरित पूर्ण करू शकणारे संपर्करहित (कॉन्टॅक्टलेस) डेबिट तसेच क्रेडिट कार्ड सार्वजनिक क्षेत्रातील स्टेट बँकेनेही सादर केले आहे. खासगी क्षेत्रात आघाडीच्या आयसीआयसीआय बँकेने देशातील अशा कार्डाचा पहिला प्रयोग जानेवारी २०१५ पासून, तर एचडीएफसी बँकेनेही असे कार्ड बाजारात यापूर्वीच आणले आहे.
‘नीयर फील्ड टेक्नॉलॉजी’ (एनएफसी)वर आधारित ‘एसबीआयइनटच’ हे कार्ड डेबिट व क्रेडिट या दोन्ही प्रकारांत आहे. असे तंत्रज्ञान असलेल्या एटीएम तसेच अन्य मशीनमध्ये असल्यानंतर ते कार्ड त्याच्याजवळ नेऊन पिन टाकावा लागतो. एसबीआयइनटच कार्डचे अनावरण स्टेट बँकेच्या अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य यांनी गुरुवारी मुंबईत केले.
भट्टाचार्य यांनी या वेळी सांगितले की, स्टेट बँकेने हे तंत्रज्ञान असलेल्या उपलब्ध असलेल्या एक लाख ‘पॉइंट ऑफ सेल’ (पीओएस)साठी १.०८ लाख नवी कार्डे प्रमुख आठ शहरांमधून देऊ केली आहेत. ही कार्डे अन्य शहरांमध्येही पुढील टप्प्यांमध्ये मिळू शकतील.
देशभरात सध्या २.५० लाखांहून अधिक असलेल्या स्टेट बँकेच्या पीओएससाठी नव्या तंत्रज्ञानाच्या अद्ययावततेकरिता प्रत्येक मशीनमागे २,५०० रुपये खर्च येईल, असेही या वेळी सांगण्यात आले.
एनएफसी काय आहे?
कॉन्टॅक्टलेस कार्डामध्ये एनएफसी अर्थात नीयर फील्ड तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात येतो. अशा प्रकारचे कार्ड हे प्रत्यक्ष एटीएम अथवा संबंधित यंत्राजवळ केवळ नेल्यानंतर पिन टाकून आर्थिक व्यवहार पूर्ण करता येतो. अशा कार्डाद्वारे गैरवापर होण्याचा धोका कमी आहे. याद्वारे वेळेची बचत व कार्ड हाताळणीची सुलभता कार्डधारकाला मिळते. पारंपरिक कार्डपेक्षा या कार्डद्वारे तीनपट जलद व्यवहार होतात. एरवीचे कार्ड हे संबंधित मशीनमध्ये प्रत्यक्ष टाकावे अथवा सरकवावे (स्वाइप) लागते. आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक देशांत अशी पद्धत प्रचलित असली तरी सध्या हे तंत्रज्ञान निवडक एटीएम तसेच पीएसटी (पॉइंट ऑफ सेल) वर उपलब्ध आहे. ज्या दालनांसमोर )))) असे चिन्ह झळकविले आहे अशा सेवा पुरवठादारांकडे हे कार्ड चालू शकेल.
जलद व्यवहारांसाठी स्टेट बँकेचेही संपर्करहित कार्ड
डेबिट अथवा क्रेडिट कार्ड प्रत्यक्ष यंत्रामध्ये न टाकताही आर्थिक व्यवहार त्वरित पूर्ण करू शकणारे संपर्करहित (कॉन्टॅक्टलेस) डेबिट तसेच क्रेडिट कार्ड सार्वजनिक क्षेत्रातील स्टेट बँकेनेही सादर केले आहे.
First published on: 15-05-2015 at 12:53 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sbi launches contactless card payment tech