बँकिंग क्षेत्रातील अग्रणी भारतीय स्टेट बँकेने, व्याजापोटी उत्पन्नातील वाढ आणि खर्चावर कठोर नियंत्रण या परिणामी जुलै-सप्टेंबरतिमाहीअखेर ३,१०० कोटी रुपयांचा निव्वळ नफ्याची कामगिरी केली. गेल्या वर्षांतील याच तिमाहीतील २,३७५ कोटी रुपयांच्या निव्वळ नफ्याच्या तुलनेत यंदा तो ३१ टक्क्य़ांनी वाढला आहे. उल्लेखनीय म्हणजे देशातील या सर्वात मोठय़ा बँकेची बुडीत कर्जाचे (एनपीए)च्या प्रमाणात समाधानकारक घसरण झाली आहे.
स्टेट बँकेचे एकूण उत्पन्न हे मागील वर्षांच्या तुलनेत ९.८५ टक्क्य़ांनी वाढून ३७,२६३ कोटी रुपयांवर गेले. तर निव्वळ व्याजापोटी उत्पन्न हे ८.३६ टक्क्य़ांनी वाढून १३,२७५ कोटींवर गेले. त्या उलट परिचालनात्मक खर्चात केवळ २.२३ टक्क्य़ांची वाढ झाली व तो सप्टेंबर तिमाहीअखेर ९,४२३ कोटी रुपये झाला. बँकेच्या नफ्याच्या कामगिरीत सुधारणेसाठी हे दोन घटकच प्रामुख्याने कारणीभूत ठरले, असे मत स्टेट बँकेच्या अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य यांनी व्यक्त केले.
मालमत्तात्मक गुणवत्तेत सुधारणा ही स्टेट बँकेच्या तिमाही कामगिरीतील सर्वात वैशिष्टय़पूर्ण बाब ठरली. बँकेच्या बुडीत कर्जाचे (एनपीए) प्रमाण हे गेल्या वर्षांतील याच तिमाहीअखेर ५.६४ टक्के असे होते, ते यंदा सप्टेंबरअखेर ४.८९ टक्क्य़ांवर आले आहे. नक्त एनपीएचे प्रमाणही २.९१ टक्क्य़ांवरून २.७३ टक्क्य़ांवर घसरले आहे. नव्याने कर्ज-थकीतातील वाढीचे (स्लिपेजेस) प्रमाण गेल्या वर्षांतील ८,३६५ कोटी रुपयांच्या तुलनेत यंदा ७,७०० कोटी रुपयांवर मर्यादित राहिले आहे. कर्जथकितात भर पडण्याचे प्रमाण हे सर्वच क्षेत्रात सारखेच असल्याचे, भट्टाचार्य यांनी सांगितले. बँकेची या तिमाहीदरम्यान वसुली मात्र ९६५ कोटी रुपयांची राहिली. जी वर्षभरापूर्वी १,४१४ कोटी रुपये होती. बँकेने तिमाहीच्या काळात ४,३५१ कोटी रुपयांच्या थकलेल्या कर्जाची पुनर्रचना केली आणि उर्वरित दोन तिमाहींमध्ये त्यात आणखी ३००० कोटी रुपयांची भर पडणे अपेक्षित असल्याचे भट्टाचार्य यांनी अंदाज व्यक्त केला.
बँकेच्या पतगुणवत्तेत सुधारणेचे स्वागत आणि उत्तम नफ्याच्या कामगिरीबाबत उत्साह म्हणून स्टेट बँकेच्या समभागाला शुक्रवारी शेअर बाजारात चांगली मागणी दिसून आली. २.५५ टक्क्य़ांची वाढीसह  हा समभाग दिवसअखेर २,७८८.४५ रुपयांवर स्थिरावला. दिवसाच्या व्यवहारात त्याने ३.२१ टक्क्य़ांची उसळी घेत २,८०६.४५ असा उच्चांकही दाखविला होता.
चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या तिमाहीत आम्हाला कृषी क्षेत्रातून कर्जथकीतात वाढ झाल्याचे आढळून आले. आता त्याच्या तीव्रतेत नरमाई येत असल्याचेही दिसत आहे. आंध्र प्रदेश व तेलंगणातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा हा परिणाम असला, तरी तेलंगणातील कर्जमाफीचा हप्ता बँकेला मिळाल्याने अन्य राज्यातूनही हा कित्ता गिरविला जाण्याबाबत आम्ही आशादायी आहोत.     
अरुंधती भट्टाचार्य, अध्यक्षा, स्टेट बँक

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा