देशातील सर्वात मोठे कर्जवाटप असलेल्या स्टेट बँकेने ठेवींवरील व्याजदरात अलीकडेच कपात केल्यानंतर आता कर्जावरील व्याज कपातीचे संकेत दिले आहेत.
स्टेट बँकेचा कर्जावरील व्याज आकारणी करणारा संदर्भ दर (बेस रेट) सर्वात कमी असला तरी त्यातही आणखी कपात लवकरच जाहीर करू, असे स्टेट बँकेच्या अध्यक्ष अरुंधती भट्टाचार्य यांनी सांगितले. मुंबईत मंगळवारी स्टेट बँकेने सर्वसमावेशक निर्देशांकांचे अनावरण केल्यानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या. खासगी क्षेत्रातील अग्रणी एचडीएफसी बँकेनेही नव्या वर्षांत मार्चमध्ये कर्जावरील व्याजाचे दर कमी करण्याचे सूतोवाच केले आहे.
एका महिन्यापूर्वी आम्ही आमचे ठेवींवरील व्याजदर कमी केले. यानंतर देशातील सर्वात मोठे कर्जवाटप असल्याने साहजिकच आम्ही कर्जावरील व्याज कधी कमी करतो याकडे आमचे कर्जदार डोळे लावून बसले होते. जेव्हा कर्जावरील व्याजदरात कपात होते तेव्हा आमचे उत्पन्न घटते, परंतु संथ अर्थव्यवस्थेमुळे कर्जाला मागणी नसल्याने जर दर कपात केली नाही तरी उत्पन्नात घट होते. आम्हाला कर्जाच्या मागणीत वाढ होईल अशी अशा आहे, म्हणून आम्ही व्याजदर कपातीचा निर्णय लगेचच घेतलेला नाही, परंतु हा निर्णय आमच्या विचाराधीन असून आम्ही लवकरच दर कपात जाहीर करू, असे भट्टाचार्य म्हणाल्या.
रिझव्र्ह बँकेचे गव्हर्नर राजन यांनी मागील पतधोरण आढाव्यात नजीकच्या काळात रेपोदर कपातीची शक्यता व्यक्त केली असून आम्हीही रेपोदर कपातीची वाट पाहत आहोत, अशी पुस्तीही भट्टाचार्य यांनी जोडली. कपातीचे प्रमाण स्पष्ट करताना, त्यांनी व्याजाचा दर पाव ते अध्र्या टक्क्याने कमी करू, अशी शक्यता बोलून दाखविली. सध्या बँकांकडे मोठी रोकड सुलभता आहे. रेपो खिडकीतून म्हणजे वाणिज्य बँकांकडून रिझव्र्ह बँकेकडे अल्पमुदतीचे कर्जव्यवहार हे सध्या दहा हजार कोटींचेही होत नाहीत, हे मुबलक तरलतेचेच द्योतक आहे, असे त्यांनी सांगितले.
स्पाइस जेटसंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना, आमचे सध्या कोणत्याही हवाई वाहतूक कंपनीला कर्जवाटप नाही, असे त्यांनी नि:संदिग्ध उत्तर दिले.